हायपॉवर लेसर तंत्रज्ञानाद्वारे ड्रोन चार्ज करणे शक्य 
विश्वसंचार

Drone Technology : हायपॉवर लेसर तंत्रज्ञानाद्वारे ड्रोन चार्ज करणे शक्य

उड्डाणादरम्यानच वायरलेस पद्धतीने चार्जिंग : चिनी संशोधकांचे नवे तंत्रज्ञान

पुढारी वृत्तसेवा

बीजिंगः चिनी संशोधकांनी एका नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला असून, यामुळे लवकरच हायपॉवर लेसरचा (उच्च-क्षमता लेसर) वापर करून ड्रोनला उड्डाणादरम्यानच वायरलेस पद्धतीने चार्ज करणे शक्य होणार आहे. संशोधकांनी एका ड्रोनच्या मॉडेलचा वापर करून या प्रणालीचा एक प्रोटोटाईप (प्रारूप) तयार केला. यामध्ये सोलर सेलप्रमाणे (सौरऊर्जेच्या पॅनलप्रमाणे) काम करणारे एक ‘रिसीव्हर’ (ऊर्जा स्वीकारणारे यंत्र) बसवण्यात आले आहे. पंखांच्या खालील बाजूला जोडलेल्या या रिसीव्हरने लेसर बीममधील ऊर्जेचे यशस्वीपणे विजेत रूपांतर केले, ज्यामुळे ड्रोनचे प्रोपेलर (पंखे) फिरण्यासाठी वीजपुरवठा झाला.

हा महत्त्वपूर्ण शोध ‘सिव्हिल एव्हिएशन युनिव्हर्सिटी ऑफ चायना’ आणि ‘तसिंगुआ युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी लावला आहे. या संशोधनाचा सविस्तर तपशील २९ जुलै रोजी ‘मॅटर अँड लाईट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात देण्यात आला आहे. ‘पूर्वीचे संशोधन प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर किंवा उपकरणावरच केंद्रित होते,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सिव्हिल एव्हिएशन युनिव्हर्सिटी ऑफ चायनाचे संशोधक जियानहुआ हान यांनी एका निवेदनात सांगितले. ‘आम्हाला प्रयोगशाळेच्या पलीकडे जाऊन विचार करायचा होता. ही प्रणाली प्रत्यक्ष विमानात कशी समाविष्ट केली जाऊ शकते, उड्डाणादरम्यान ती कशी थंड ठेवली जाऊ शकते आणि ती उड्डाणासाठी कशी सुसंगत बनवता येईल. हा केवळ साहित्य शास्त्राचा प्रश्न नसून, एक अभियांत्रिकी आव्हानदेखील आहे.’ ड्रोनचे वायरलेस चार्जिंग कसे होते? हा रिसीव्हर ‘पेरोव्हस्काईट लेसर सेल-थर्मोइलेक्ट्रिक’ (PLC-TE) टँडम डिव्हाईस म्हणून ओळखला जातो. लेझरच्या प्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी हे यंत्र विशेषतः डिझाईन केले गेले आहे. पेरोव्हस्काईट हे अत्याधुनिक सोलर सेल्समध्ये वापरले जाणारे एक अत्यंत कार्यक्षम साहित्य आहे. याच्या विशेष स्फटिक रचनेमुळे ते पारंपरिक सिलिकॉनच्या तुलनेत प्रकाशाच्या स्पेक्ट्रममधील अधिक तरंगलांबी शोषून घेऊ शकते. याच कारणामुळे भविष्यातील सौर तंत्रज्ञानासाठी या साहित्याला मोठी पसंती दिली जात आहे.

काही संशोधनांनुसार, याचा वापर घरातील सामान्य प्रकाशाचे उपयुक्त विजेमध्ये रूपांतर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. हिरव्या रंगाचा लेसर बीम जेव्हा या रिसीव्हरवर टाकला गेला, तेव्हा त्याने ३८.४९ टक्के प्रकाशाचे विजेत रूपांतर केले. ही कार्यक्षमता यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी (DOE) द्वारे नोंदवलेल्या पेरोव्हस्काईट-सिलिकॉन टँडम सेल्सच्या ३४ टक्क्यांच्या कमाल कामगिरीपेक्षा खूप जास्त आहे. मात्र, सुरुवातीच्या चाचण्यांदरम्यान संशोधकांच्या लक्षात आले की, लेसरच्या वापरामुळे एक अडचण निर्माण होत होती. लेसरमुळे ड्रोन अत्यंत तीव्र तापमानापर्यंत तापत होता, ज्यामुळे त्याची एकूण कार्यक्षमता कमी होत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT