Ancient Egypt Wine | प्राचीन इजिप्तमध्ये वाईन होते औषध अन्‌ पुनर्जन्माचे प्रतीक! 
विश्वसंचार

Ancient Egypt Wine | प्राचीन इजिप्तमध्ये वाईन होते औषध अन्‌ पुनर्जन्माचे प्रतीक!

चार हजार वर्षांपूर्वी इजिप्‍तमध्‍ये होती रेड आणि व्‍हाईट वाईन

पुढारी वृत्तसेवा

कैरो : प्राचीन इजिप्तची संस्कृती केवळ पिरॅमिडस्‌ आणि ममींसाठीच नाही, तर त्यांच्या प्रगत जीवनशैलीसाठीही ओळखली जाते. ‘हिस्ट्री एक्स्ट्रा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत वाईन ही केवळ एक पेय नव्हती, तर शेतीची माती सुपीक करण्यापासून ते मृत्यूनंतरच्या पुनर्जन्मावर असलेल्या धार्मिक विश्वासापर्यंत वाईन्सचा मोठा प्रभाव होता. इजिप्शियन लोकांनी ४००० वर्षांपूवी वाईन मेकिंग तंत्रज्ञानात इतकी प्रगती केली होती की, त्यांनी रेड आणि व्हाईट अशा दोन्ही प्रकारच्या वाईन्स विकसित केल्या होत्या, इजिप्तमधील उत्खननात सापडलेली भित्तिचित्रे आणि मातीची भांडी यांच्या अभ्यासातून इजिप्शियन लोकांचे वाईनशी असलेले अनोखे नाते समोर आले आहे. इजिप्शियन संस्कृतीत वाईन्सचे प्रमुख उपयोग आणि महत्त्व त्‍यातून अधोरेखित झाले आहे.

शेती आणि सुपीकतेत वाईनचा वापर प्राचीन इजिप्‍तमध्‍ये मोलाचा मानला जात असे. नाईल नदीला येणाऱ्या पुरामुळे गाळाची नवीन माती तयार होत असे. या अतिरिक्त व सुपीक मातीचा वापर करून द्राक्षांच्या बागा (वाईनयार्ड) फुलवल्या जायच्या. द्राक्षाच्या वेलींमुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होई.

धार्मिक विधी आणि पुनर्जन्माची संकल्पना

इजिप्शियन संस्कृतीत वाईनचा लाल रंग हा पुनर्जन्माचे दैवी प्रतीक मानला जात असे. राजांच्या किंवा फॅरोच्या मृत्यूनंतर त्यांच्या थडग्यांमध्ये वाईनची भांडी ठेवली जात, जेणेकरून मृत्यूनंतरच्या प्रवासात त्यांना ताकद मिळावी.

औषधी आणि वैद्यकीय वापर

प्राचीन इजिप्तमध्ये वाईनचा वापर उत्तम जंतुनाशक आणि वेदनाशामक म्हणून केला जाई. त्यात विविध जडीबुटी आणि वनस्पती मिसळून औषधे तयार केली जात असत.

सामाजिक प्रतिष्ठा आणि राजेशाही स्टेटस

प्राचीन इजिप्‍तमध्‍ये सामान्य नागरिक मुख्यत्वे बीअर पीत असत, तर वाईन हे केवळ राजे, सरदार आणि श्रीमंत वर्गाचे पेय मानले जाई. वाईनच्या जारवर (Jars) ती कोणत्या वर्षात, कोणत्या बागेत आणि कोणी तयार केली, याचा स्पष्ट उल्लेख असे. इजिप्शियन लोकांनी वाईन मेकिंग तंत्रज्ञानात इतकी प्रगती केली होती की, त्यांनी रेड आणि व्हाईट अशा दोन्ही प्रकारच्या वाईन्स विकसित केल्या होत्या, त्‍याचेे अवशेष आजही पुरातत्त्वशास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान सापडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT