Red Hair People| लाल केस असणारे लोक नामशेष होणार?  
विश्वसंचार

Red Hair People| लाल केस असणारे लोक नामशेष होणार?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : लाल केस असणारे लोक जगात अत्यंत दुर्मीळ मानले जातात. जगभरातील एकूण लोकसंख्येमध्ये नैसर्गिक लाल केस (Ginger locks) असणाऱ्यांचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ही संख्या इतकी कमी असल्याने, भविष्यात लाल केस ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख पूर्णपणे नष्ट होऊन जगात फक्त काळे ते सोनेरी (Blond) केसांचेच लोक उरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, याचे सोपे उत्तर ‘नाही’ असे आहे. जनुकशास्त्राच्या अभ्यासानुसार हे वैशिष्ट्य भविष्यातही टिकून राहील, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर बिहेव्हियरल जिनेटिक्स'मधील संशोधक कॅटरिना झोरिना-लिचटेनवॉल्टर यांनी सांगितले, ‘‘लाल केस असणारे लोक नामशेष होत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’’ लाल केसांसाठी जबाबदार असलेली जनुके निरुपद्रवी असतात. ती मानवाच्या प्रजनन प्रक्रियेत कोणताही अडथळा आणत नाहीत किंवा त्यांचा अशा कोणत्याही आजाराशी संबंध नाही ज्यामुळे व्यक्तीचे आयुष्य कमी होईल. तरीही, लाल केस नष्ट होण्याबद्दलच्या अफवा काही नवीन नाहीत.

युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथील प्रोफेसर एमिरिटस इयान जॅक्सन यांनी सांगितले की, ‘‘लाल केस नामशेष होणार का? हा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून विचारला जात आहे. अगदी १९ व्या शतकाच्या मध्यापासून सोनेरी केस असणाऱ्यांबाबतही अशाच प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या.’’ या गैरसमजामागे एक तर्क दिला जातो...लाल केस दुर्मीळ आहेत. युनायटेड किंगडम आणि आयर्लंड यांसारख्या देशांमध्ये जिथे लाल केसांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तिथेही ही लोकसंख्या केवळ १० टक्के आहे. त्यातच लाल केस हे 'रिसेसिव्ह ट्रेट’ म्हणजेच अप्रभावी जनुकीय लक्षण आहे. याचा अर्थ, जर माता आणि पिता या दोघांमध्येही लाल केसांचे जनूक असेल, तरच त्यांच्या मुलांचे केस लाल होण्याची शक्यता असते.

लाल केस असणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेला सूर्याच्या उन्हामुळे सहज इजा (Sunburn) होते. त्यामुळे ‘मेलानोमा’सारख्या गंभीर त्वचेच्या कर्करोगामुळे ही लोकसंख्या धोक्यात येईल का, असाही प्रश्न विचारला जातो. लाल केस हे साधारणपणे गोऱ्या त्वचेशी जोडलेले असतात (जरी इतर वंशाच्या लोकांमध्येही लाल केस आढळत असले, तरी). त्यामुळे त्यांच्यात त्वचेच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांच्या मते, हा धोका केवळ उन्हामुळे त्वचा भाजण्यापुरता मर्यादित नाही. लाल रंगाचे केस तयार करणाऱ्या ‘फियोमेलानिन' या रंगद्रव्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे आणि डीएनए दुरुस्तीची क्षमता कमी असणाऱ्या जनुकीय घटकांमुळेही हा धोका वाढतो. मात्र, असे असले तरी यामुळे ही लोकसंख्या नामशेष होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT