नवी दिल्ली : हिमयुगातील विशाल ‘वुली मॅमथ’ हजारो वर्षांपूर्वी नामशेष झाला. मात्र, या प्राण्याची काही वैशिष्ट्ये पुन्हा जिवंत करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील 'कॉलॉसल बायोसायन्सेस' ही जैवतंत्रज्ञान कंपनी एआय, जनुक-संपादन आणि प्रजनन तंत्रज्ञानाच्या मदतीने थंड वातावरणाशी जुळवून घेऊ शकणारा ‘मॅमथसदृश हत्ती’ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या प्रकल्पाचा उद्देश हुबेहूब वुली मॅमथ तयार करणे नाही. संशोधक मॅमथच्या काही वैशिष्ट्यांशी संबंधित जनुकीय बदल आशियाई हत्तीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. आशियाई हत्ती हा मॅमथचा आजच्या काळातील जवळचा जिवंत नातेवाईक मानला जातो.
एआय कशी करणार मदत?
संशोधक गोठलेल्या मॅमथच्या अवशेषांमधून मिळालेल्या जनुकीय माहितीची तुलना जिवंत हत्तींच्या डीएनएशी करत आहेत. एआय आणि संगणकीय साधनांच्या मदतीने मॅमथच्या दाट केसांचा थर, शरीरातील चरबी आणि थंड हवामानाशी जुळवून घेण्याशी संबंधित जनुकीय बदल ओळखण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र केवळ योग्य जनुके ओळखणे पुरेसे नाही. त्यानंतर जनुक-संपादन, भ्रूणविकास आणि हत्तींच्या प्रजननाशी संबंधित अनेक आव्हाने पार करावी लागणार आहेत.
२०३० च्या दशकात शक्यता
कंपनीने यापूर्वी २०२८पर्यंत मॅमथसदृश पिल्लू तयार करण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले होते; मात्र प्रकल्पातील वैज्ञानिक अडचणी लक्षात घेता ही वेळ आता २०३०च्या दशकापर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे. संशोधकांना यश मिळाले तरी तयार होणारा प्राणी मूळ वुली मॅमथची हुबेहूब प्रतिकृती नसेल. त्याच्यात मॅमथची निवडक वैशिष्ट्ये असलेला हत्ती तयार होऊ शकतो. अशा प्राण्यांना योग्य वातावरणात जगवणे आणि नामशेष प्रजातीची पर्यावरणीय भूमिका पुन्हा निर्माण करणे शक्य होईल का, हे अद्याप अनिश्चित आहे.