वॉशिंग्टन : जेव्हा सूर्याचा अंत होईल, तेव्हा या निर्माण होणाऱ्या महाप्रलयातून सूर्यमालेचा बाह्य भागही सुरक्षित राहणार नाही, असा इशारा एका नवीन संशोधनातून देण्यात आला आहे. शास्त्रज्ञांचा आतापर्यंत असा समज होता की, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या चार महाकाय ग्रहांचा समावेश असलेला सूर्यमालेचा बाह्य भाग पुढील शेकडो अब्ज वर्षांपर्यंत बहुतांशी आहे तसाच राहील. मात्र, एका नवीन अभ्यासानुसार, सूर्याचे इंधन संपल्यावर या बाह्य ग्रहांच्या कक्षा विचित्र आकार घेऊ शकतात. यामुळे सूर्य ‘रेड जायंट’ (लाल महाकाय तारा) मध्ये रूपांतरित झाल्यानंतर पुढील तीन अब्ज वर्षांच्या आत हे ग्रह एकमेकांच्या मार्गात येऊन धडकतील आणि एकमेकांना नष्ट करतील.
‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये २१ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेले हे निष्कर्ष, विशिष्ट ताऱ्यांभोवती कोणत्या प्रकारचे बाह्यग्रह फिरतात, याविषयीच्या आपल्या आकलनाला नवी दिशा देऊ शकतात. सुमारे ५ अब्ज वर्षांनंतर, सूर्याच्या गाभ्यातील संपूर्ण हायड्रोजन संपल्यानंतर तो फुगून एका ‘रेड जायंट’मध्ये रूपांतरित होईल. या काळात आपला सूर्य सध्याच्या आकारापेक्षा १०० पटीने मोठा होईल आणि या प्रक्रियेत बुध, शुक्र आणि शक्यतो पृथ्वीलाही गिळंकृत करेल, अशी माहिती या संशोधनात सामील नसलेले युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा येथील ग्रहशास्त्रज्ञ नॅथन काईब यांनी दिली. या भीषण स्फोट आणि फुगवट्यानंतर, सूर्य संकुचित होऊन त्याचा एक मृत गाभा उरेल, ज्याला ‘व्हाईट ड्वार्फ' (श्वेत बटू) म्हटले जाते.
आतापर्यंत शास्त्रज्ञांना वाटत होते की, चारही बाह्य ग्रह या टप्प्यातून सुरक्षित बाहेर पडतील. १९९८ मधील एका सिम्युलेशनआधारित अभ्यासात असे सुचवण्यात आले होते की, सूर्य आपल्या बाह्य थरांमधून बाहेर टाकणारा वायू या चार ग्रहांना बाहेर ढकलून त्यांच्या कक्षेची त्रिज्या दुप्पट करेल. केवळ एखाद्या भरकटलेल्या ताऱ्याचा गुरुत्वाकर्षण प्रभावच ही नवी रचना विस्कळीत करू शकतो आणि अशा घटना दर अब्ज-अब्ज वर्षांतून एकदाच घडतात, असे मानले जात होते. या जुन्या शक्यता ‘सूर्य आपले बाह्य थर अगदी संथ आणि सपाटपणे बाहेर टाकेल’ या गृहीतकावर आधारित होत्या. तथापि, ताऱ्यांच्या अलीकडील निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की, ताऱ्यांचे वस्तुमान संथपणे नव्हे, तर धक्के बसल्यासारख्या (jerkier) पद्धतीने कमी होते. यामध्ये सूर्याच्या प्लाझ्माच्या लहरींमुळे वायूचे ढग बाहेर फेकले जातात, जणू आपला सूर्य स्वतःमधील वस्तुमानाचे मोठे गोळे बाहेर थुंकत आहे.