न्यूयॉर्क : गेल्या 100 वर्षांपासून वैद्यकीय जगतासाठी मोठे आव्हान ठरलेल्या ‘अल्झायमर’ या आजारावर अमेरिकन वैज्ञानिकांनी एक क्रांतिकारी तोडगा शोधला आहे. मेंदूतील एका विशिष्ट घटकाचा समतोल राखून केवळ हा आजार रोखता येत नाही, तर गेलेली स्मरणशक्तीदेखील परत मिळवता येते, असा खळबळजनक दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे.
‘सेल रिपोर्टस् मेडिसिन’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले असून, यामुळे जगभरातील अल्झायमर रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संशोधकांच्या मते, मेंदूतील पेशींना ऊर्जा देणारा ‘नॅड प्लस’ नावाचा रेणू कमी होणे हे अल्झायमरचे मुख्य कारण आहे. अभ्यासात असे दिसून आले की, अल्झायमरने ग्रस्त रुग्ण आणि उंदीर दोघांच्याही मेंदूतील ‘नॅड प्लस’ची पातळी वेगाने खाली घसरते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊन स्मरणशक्ती नष्ट होऊ लागते.
हॅरिंग्टन डिस्कव्हरी इन्स्टिट्यूटचे डॉ. अँर्ड्यू ए. पायपर आणि त्यांच्या टीमने प्रयोगशाळेत विशेष उंदरांवर हा प्रयोग केला. या उंदरांमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने मानवाप्रमाणेच अल्झायमरची लक्षणे निर्माण करण्यात आली होती. वैज्ञानिकांनी ‘PC3-20’ नावाच्या एका औषधी घटकाचा वापर करून उंदरांच्या मेंदूतील ‘नॅड प्लस’चा समतोल पुन्हा प्रस्थापित केला. ज्या उंदरांमध्ये आजाराची सुरुवात झाली नव्हती, त्यांना औषध दिल्यानंतर अल्झायमर झालाच नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या उंदरांमध्ये हा आजार शेवटच्या टप्प्यात होता, त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेतही मोठी सुधारणा झाली. उपचारांनंतर उंदरांनी त्यांची विचार करण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता पूर्णपणे परत मिळवली. डॉ. अँर्ड्यू पायपर यांनी सांगितले की, ‘मेंदूची ऊर्जा पुन्हा बहाल करून आजारामुळे झालेले नुकसान भरून काढता येते, हे यातून सिद्ध झाले आहे. जरी हा प्रयोग सध्या प्राण्यांपुरता मर्यादित असला, तरी मानवांवरील क्लिनिकल ट्रायल्ससाठी (चाचण्यांसाठी) या संशोधनाने एक मोठा मार्ग खुला केला आहे.