वाळवंटात जंगली घोडे आणि गाढव का खोदतात ‘विहिरी’?  
विश्वसंचार

Wild Horses : वाळवंटात जंगली घोडे आणि गाढव का खोदतात ‘विहिरी’?

तज्ज्ञांचा ३ वर्षांचा अभ्यास, समोर आले धक्कादायक निकाल

पुढारी वृत्तसेवा

वाशिंग्टन : उन्हाळ्यात अमेरिकेच्या सोनोरा वाळवंटात नद्या आणि ओढे पूर्णपणे सुकतात. या समस्येचा सामना करण्यासाठी जंगली घोडे आणि गाढव काहीतरी असे करतात, जे ऐकायला सामान्य वाटत नाही. पाण्याच्या शोधात ते चक्क जमीन खणून ‘विहिरी’ तयार करतात. या प्राण्यांनी बनवलेल्या विहिरींवर संशोधकांनी २०१५ मध्ये लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि तीन उन्हाळ्यांच्या काळात ॲरिझोना येथील चार ठिकाणांवरील त्यांच्या पाण्याच्या स्रोतांचा नकाशा तयार केला, ज्यातून अतिशय आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले.

२०१५ ते २०१८ दरम्यान केलेल्या आपल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळले की, हे विहिरींचे पाणी संबंधित भागातील एकूण भूपृष्ठावरील पाण्याच्या ७४ टक्क्यांपर्यंत पाणी पुरवू शकत होते. कॅमेऱ्यांनी सोनोरा आणि मोजावे वाळवंटात विहिरींजवळ येणाऱ्या पाठीचा कणा असलेल्या ५७ प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती टिपल्या, ज्यामध्ये गाणारे पक्षी ते पर्वतीय सिंहांपर्यंतच्या प्राण्यांचा समावेश होता. या अभ्यासाची सुरुवात इकोलॉजिस्ट एरिक लुंडग्रेन यांच्या एका निरीक्षणातून झाली. २०१४ मध्ये त्यांनी जंगली गाढवांना कोरडी जमीन खणताना पाहिले आणि त्यांच्या मनात विचार आला की, हे खणलेले खड्डे केवळ ते पाणी पिणाऱ्या प्राण्यांनाच पाणी पुरवत आहेत की इतरांनाही? याची खात्री करण्यासाठी लुंडग्रेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ॲरिझोना येथील सोनोरा वाळवंटात घोडे आणि गाढवांच्या विहिरी व भूजलावर चालणाऱ्या नद्या,ओढ्यांमधील पाण्याचा नकाशा तयार केला.

२०१५ ते २०१८ या तीन उन्हाळ्यांमध्ये, जेव्हा कडक ऊन आणि पावसामुळे पाण्याची स्थिती सतत बदलत असते, तेव्हा हा अभ्यास केला गेला. निकालातून हे समोर आले की, या विहिरी पाणी उपलब्धतेमध्ये खूप मोठा फरक करू शकतात. एका ठिकाणी नदी सुकल्यानंतर या विहिरी पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत बनल्या. संशोधनानुसार, दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी उपलब्ध भूपृष्ठावरील पाण्याचा ७४ टक्क्यांपर्यंत पुरवठा केला.या खड्ड्यांमुळे पाण्याचे स्रोत एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी सहज उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या स्रोतांमधील अंतर ८४३ मीटरने कमी केले. जिथे नद्या आणि इतर स्रोत आटल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी लांबवर भटकावे लागते आणि उरलेल्या पाण्याच्या स्रोतांभोवती स्पर्धा वाढते, अशा ठिकाणी हे अंतर कमी होणे खूप महत्त्वाचे ठरते. याचा फायदा केवळ पाण्याची तहान भागवणाऱ्या प्राण्यांपर्यंतच मर्यादित नाही. संशोधकांना असे आढळले की, मागे सोडलेल्या या विहिरींमुळे ‘कॉटनवूड’ वनस्पतींच्या बियाण्यांसाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यांना वाढण्यासाठी ओलसर आणि मोकळ्या जमिनीची गरज असते. एकंदरीत मूर्ख समजल्या जाणाऱ्या गाढवांच्या तसेच घोड्यांच्याही दूरदृष्टीमुळे अन्य जीवांना व पर्यावरणालाही असा लाभ मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT