कैरो : इजिप्तचा ‘ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा’ (ज्याला ‘खुफूचा पिरॅमिड’ असेही म्हणतात) गेली 4,600 हून अधिक वर्षे शक्तिशाली भूकंपांचे धक्के सोसूनही दिमाखात उभा आहे. हा पिरॅमिड इतका काळ सुरक्षित कसा राहिला, याचा उलगडा आता एका नव्या संशोधनातून झाला आहे. या संशोधनानुसार, या पिरॅमिडची रचना भूकंपाच्या लहरी आणि कंपनांना तोंड देण्यासाठी अत्यंत लवचिक आणि सक्षम आहे.
इजिप्तच्या जुन्या साम्राज्यात (इ.स.पूर्व 2649 ते 2150) बांधल्या गेलेल्या या पिरॅमिडची उंची हजारो वर्षांत केवळ 33 फूट (10 मीटर) कमी झाली आहे. या प्रदीर्घ काळात पिरॅमिडने अनेक तीव्र भूकंप झेलले आहेत. 1847 मध्ये कैरोच्या दक्षिणेकडील फयुम शहरात आलेल्या 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा आणि 1992 मधील 5.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा यात समावेश आहे. 1992 च्या भूकंपामुळे पिरॅमिडच्या अगदी वरच्या भागातील काही दगड खाली कोसळले होते; परंतु मुख्य रचनेला कोणतीही हानी पोहोचली नव्हती. ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या नियतकालिकात गुरुवारी (21 मे) प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, पिरॅमिडच्या अंतर्गत रचनेमध्ये कंपने शोषून घेण्याची अद्भुत क्षमता आहे.
सम्राट खुफूच्या शयनकक्षाच्या वर असलेल्या ‘प्रेशर-रिलीव्हिंग चेंबर्स’ (दाब कमी करणार्या खोल्या) सारख्या विशिष्ट वास्तुकला वैशिष्ट्यांमुळे भूकंपाचे धक्के पिरॅमिडच्या वरच्या भागापर्यंत पोहोचताना कमकुवत होतात. ‘हे संशोधन प्राचीन इजिप्शियन बांधकामकर्त्यांच्या विलक्षण व्यावहारिक अभियांत्रिकी ज्ञानावर प्रकाश टाकते. त्यांनी शतकानुशतके प्रयोग आणि सुधारणा करून ही अत्यंत प्रभावी बांधकाम पद्धती विकसित केली होती,’ असे कैरोमधील ‘नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रॉनॉमी अँड जिओफिजिक्स’चे भूवैज्ञानिक आणि या अभ्यासाचे सह-लेखक असीम सलामा यांनी सांगितले. सलामा आणि त्यांच्या पथकाने ग्रेट पिरॅमिडच्या आत आणि सभोवताली 37 वेगवेगळ्या ठिकाणी ‘व्हायब्रेशन सेन्सर्स’ (कंपन मोजणारी यंत्रे) बसवले होते.
जेव्हा पिरॅमिडमध्ये पर्यटक नव्हते, तेव्हा त्यांनी या कंपनांची नोंद घेतली. या संशोधनातून असे दिसून आले की, संपूर्ण पिरॅमिडमधील कंपनांची वारंवारता 2.0 ते 2.6 हर्टझ् दरम्यान होती, जी अगदी एकसमान आहे. विशेष म्हणजे, पिरॅमिडच्या जवळील जमिनीची वारंवारता सुमारे 0.6 हर्टझ् होती. जमिनीची आणि पिरॅमिडची वारंवारता एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असल्यामुळे, भूकंपाच्या वेळी जमिनीतून प्रवास करणार्या विनाशकारी लहरी पिरॅमिडला प्रभावित करू शकत नाहीत. हाच फरक पिरॅमिडच्या सुरक्षिततेचे मुख्य कारण ठरला आहे. ‘ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनामध्ये या माहितीचा मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे वास्तूच्या रचनेची स्थिरता, त्यातील लपलेले कमकुवत दुवे आणि वास्तूच्या मूळ रचनेला धक्का न लावता ती दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची, याच्या धोरणांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते,’ असे स्पष्टीकरण सलामा यांनी दिले.