लंडन : एका अंदाजानुसार, माणूस आपल्या आयुष्यातील सुमारे एक-तृतीयांश वेळ झोपेत (किंवा झोपायचा प्रयत्न करत) घालवतो. झोप ही मेंदू व शरीरासाठी विश्रांतीची अवस्था असून ती नियमित अंतराने येते. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. झोपेच्या काळात शरीरात काय घडते याबाबत अनेकांना कुतूहल असते.
झोपेच्या काळात शरीराची मूलभूत तापमान पातळी कमी होते, हृदयाचे ठोके आणि श्वसन मंदावतात आणि एकूण चयापचय क्रियाही सुमारे 10 टक्के घटते. झोपलेले शरीर वरवर पाहता निष्क्रिय वाटते, पण झोपेत मेंदू खूप कार्यशील असतो. झोपेमध्ये मेंदू महत्त्वाची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करतो. मेंदूतील पेशी आणि त्यांच्यातील संबंध अधिक प्रभावी होण्यासाठी झोप आवश्यक आहे. स्मृती स्थिर करणे, माहिती प्रक्रिया करणे आणि साठवणे ही महत्त्वाची कामेदेखील झोपेतच होतात, विशेषतः स्वप्नांच्या माध्यमातून.
झोपेमध्ये शरीरही स्वतःची डागडुजी आणि पेशींची भरपाई करते. हार्मोन्स तयार होणे, ऊतकांची वाढ आणि स्नायूंची दुरुस्ती या सर्व प्रक्रिया झोपेत अधिक प्रमाणात होतात. मेंदूतून अपायकारक द्रव्ये आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची प्रणालीही झोपेत सर्वाधिक कार्यरत असते. झोपेच्या विविध टप्प्यांमध्ये मेंदू विविध प्रकारचे विद्युत-तरंग (brainwaves) निर्माण करतो. झोपेच्या सुरुवातीला तरंग जलद असतात, पण झोप गडद होत गेल्यावर त्यांचा वेग कमी होतो.