No-Shave November | जगभरातील पुरुष नोव्हेंबरमध्ये ‘शेव्हिंग’ का टाळतात? 
विश्वसंचार

No Shave November Reason| जगभरातील पुरुष नोव्हेंबरमध्ये ‘शेव्हिंग’ का टाळतात?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : नोव्हेंबर महिना सुरू झाला की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू होतो. तो म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’. ट्विटर (एक्स) असो, इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुक, सगळीकडे पुरुष मंडळी लांब केस, वाढलेल्या दाढी-मिशांमध्ये आपले फोटो (# NoShaveNovember) शेअर करताना दिसतात. अनेकांसाठी ही केवळ एक फॅशन किंवा आळशीपणासाठी मिळालेली सूट असते, पण या ‘नो शेव्ह’ करण्यामागे एक खास कारण आहे.

नोव्हेंबर महिन्यात पुरुष दाढी (शेव्हिंग) करत नाहीत, तसेच केस कापत नाहीत. हा ट्रेंड केवळ दाढी न करण्यापुरता मर्यादित नाही. कटिंग, वैक्सिंग, थ्रेडिंग यांसारखे शरीराचे केस काढण्याचे सर्व प्रयत्न या 30 दिवसांसाठी थांबवले जातात. विशेष म्हणजे, हा ट्रेंड फक्त एका शहरात किंवा देशात नाही, तर जगभर मोठ्या उत्साहाने पाळला जातो. पण, या ट्रेंडमागे लपलेला मूळ उद्देश अनेक लोकांना माहीत नसतो. ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ साजरा करण्यामागे असलेले मुख्य कारण म्हणजे कॅन्सर, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती करणे. या अभियानाला पाठिंबा देणारे पुरुष नोव्हेंबर महिन्यात दाढी किंवा केस कापणे बंद करतात.

केस आणि दाढीची काळजी घेण्यासाठी जो पैसा खर्च होतो, तो खर्च या मोहिमेला दान केला जातो. कॅन्सर प्रतिबंध, उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना या पैशांची मदत होते. या अभियानाची सुरुवात 2009 साली एका अमेरिकन स्वयंसेवी संस्थेद्वारे, ‘मॅथ्यू हिल फाऊंडेशन’ ने केली होती. या संस्थेच्या स्थापनेमागे एक दुःखद कहाणी आहे. 2007 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात राहणार्‍या मॅथ्यू हिल यांचे कॅन्सरशी लढताना निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या आठ मुलांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्याप्रमाणेच कॅन्सरशी झुंज देणार्‍या इतरांना मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. यातूनच ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या मोहिमची सुरुवात झाली. सुरुवातीच्या 2 वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम जगभर पोहोचवण्याचे प्रयत्न झाले आणि हळूहळू याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज अनेकजण कारण पूर्णपणे माहीत नसतानाही हा ट्रेंड साजरा करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT