औषधांना कडू चव का असते? आणि ही चव महत्त्वाची का आहे? File Photo
विश्वसंचार

औषधांना कडू चव का असते? आणि ही चव महत्त्वाची का आहे?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : डॉक्टरने दिलेली औषधे वेळेवर घेणे, हा उपचाराचा महत्त्वाचा भाग असतो. यासाठी औषधे सहज उपलब्ध असणे आवश्यक आहे; पण अनेकदा औषधांचे दुष्परिणाम, ते घेण्याची जटिल प्रक्रिया किंवा इतर औषधांशी होणारी प्रतिक्रिया याशिवाय आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे औषधांची चव. अनेक लोकांना, विशेषतः लहान मुलांना औषधे कडू वाटतात. ‘तुम्ही तुमच्याच औषधाची चव घ्या’ (Taste of your own medicine) हा वाक्प्रचार याच कडू चवीमुळे रूढ झाला आहे. याचा अर्थ, तुम्ही इतरांना कसे वाटायला लावले, याचा अनुभव घ्या. औषधे अशी कडू का असतात व अशी चव औषधांना गरजेची आहे का?

औषधांमध्ये वापरले जाणारे अनेक घटक हे वनस्पतींमधून मिळवलेल्या संयुगांपासून तयार केलेले असतात आणि या संयुगांची नैसर्गिक चव कडू असते. उदा. अ‍ॅस्पिरिन हे अ‍ॅसिटिलसॅलिसिलिक अ‍ॅसिडपासून (acetylsalicylic acid) बनवलेले आहे. हे अ‍ॅसिड विलो (willow) झाडाच्या सालीमध्ये आढळणार्‍या सक्रिय घटकाचे कृत्रिम रूप आहे. चवींच्या संवेदनांमध्ये कडू चव ही शरीरासाठी एक प्रकारची संरक्षण यंत्रणा म्हणून कार्य करते. मोठ्या प्रमाणात घेतल्यास, रोगांवर उपचार करणारी औषधेदेखील विषारी ठरू शकतात.

कडू चवीमुळे आपण जे खात आहोत ते संभाव्यतः हानिकारक असू शकते, याची जाणीव आपल्याला होते. म्हणूनच औषध नेहमी लेबलवर नमूद केलेल्या डोसमध्येच घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना ही कडू चव विशेष त्रासदायक ठरते. कारण, प्रौढांपेक्षा त्यांची चव ओळखण्याची क्षमता अधिक संवेदनशील असते. जी चव प्रौढांना केवळ थोडीशी कडू वाटते, ती लहान मुलांसाठी खूप असह्य असू शकते. औषध सर्वप्रथम प्रभावी असणे महत्त्वाचे आहे, त्याची चव चांगली असणे नाही, हे खरे असले, तरी लहान मुलांसाठी जर औषध इतके कडू असेल की ते गिळणेच अशक्य झाले, तर उपचारात अडथळा येतो.

यामुळे मुलांना औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करण्यास अडचण येते, जे कधी कधी जीवघेणेदेखील ठरू शकते. उदाहरणार्थ, काही अँटीरेट्रोव्हायरल औषधे इतकी कडू होती की, 2020 मध्ये त्यांच्यासाठी खास गोड, विरघळणारा पर्याय तयार करण्यात आला. चवीसाठी औषधांमध्ये गोड पदार्थ (Additives) मिसळल्यास, त्याचा सक्रिय घटकांवर (active ingredients) विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.

औषध प्रभावी असणे अधिक महत्त्वाचे आहे, त्यामुळे चवीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. कॅप्लेट स्वरूपातील काही गोळ्या, जसे की आयबुप्रोफेन (ibuprofen), वेगळ्या असतात. पोटावर होणार्‍या परिणामांमुळे, त्या आतड्यांपर्यंत पोहोचल्यानंतरच विरघळतील अशा प्रकारे डिझाईन केलेल्या असतात. औषधांची कडू चव कमी करण्यासाठी, ती गोड पेयासोबत घेणे किंवा वास आणि चव यांच्यातील संबंधामुळे गोळ्या घेताना नाक बंद करणे असे अनेक सोपे उपाय केले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT