Tea Addiction Habit | चहाशिवाय दिवसाची सुरुवात का होत नाही? 
विश्वसंचार

Tea Addiction Habit | चहाशिवाय दिवसाची सुरुवात का होत नाही?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सकाळच्या पहिल्या किरणासोबत घरात जर चहा उकळण्याचा सुगंध आणि भांड्यांचा आवाज ऐकू आला नाही, तर अनेकांचा दिवस अपूर्ण वाटतो. अनेक लोकांसाठी सकाळचा चहा हे केवळ एक साधे पेय नाही, तर ती एक भावना आहे. जोपर्यंत चहाचा पहिला घोट गळ्याखाली उतरत नाही, तोपर्यंत आमची झोप पूर्णपणे उडत नाही, असे म्हणणारे अनेकजण आपल्याला भेटतात. पण कधी विचार केला आहे का की असे का होते? चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात का होऊ शकत नाही?

तज्ज्ञांच्या मते, सकाळचा चहा आपल्या मेंदूसाठी एका ‌‘सायकोलॉजिकल सिग्नल‌’सारखा (मानसशास्त्रीय संकेत) काम करतो. हा संकेत मेंदूला सांगतो की नवीन दिवस सुरू झाला असून आता सक्रिय होण्याची वेळ आली आहे. वास्तविक, आपल्या मेंदूला ठराविक दिनक्रम किंवा सवयी खूप आवडतात. जेव्हा एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे रोज सकाळी उठून सर्वात आधी चहा पिते, तेव्हा चहाचा सुगंध, त्याचा घट्टपणा, गरमागरमपणा आणि चव मेंदूमध्ये एक हक्काची जागा तयार करतात. मेंदू या सर्व गोष्टींना सतर्कता, आराम आणि दिवसाला सामोरे जाण्याच्या मानसिक तयारीशी जोडून घेतो. मानसशास्त्रामध्ये ‌‘कंडिशन रिस्पॉन्स‌’ नावाची एक संज्ञा आहे. जेव्हा तुम्ही वर्षानुवर्षे एखादी सवय वारंवार वापरता, तेव्हा तुमचा मेंदू स्वतःहून त्या गोष्टीची अपेक्षा करू लागतो.

मनोरंजक बाब म्हणजे, चहामध्ये असलेले कॅफिन रक्तामध्ये मिसळून त्याचा शरीरावर परिणाम सुरू होण्यापूर्वीच, केवळ चहा बनवण्याची प्रक्रिया आणि तो कपात ओतण्याचा आवाजच मेंदूला एक मानसिक शांतता आणि फोकस मिळवून देतो. म्हणजेच, चहा फक्त समोर पाहणे आणि त्याचा पहिला घोट घेणेच तुमचा ताण कमी करण्यासाठी पुरेसे ठरते. चहा पिणे आणि त्यामुळे ताजेतवाने वाटणे हा एक चांगला अनुभव असला, तरी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही. जर एखाद्या दिवशी सकाळी चहा मिळाला नाही आणि तुम्हाला प्रचंड थकवा, चिडचिड, अस्वस्थता किंवा तीव्र डोकेदुखी जाणवू लागली, तर हा एक धोक्याचा इशारा आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही चहामधील कॅफिनचे व्यसनी झाला आहात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT