शुक्राची चांदणी इतकी तेजस्वी का? Pudhari File photo
विश्वसंचार

शुक्राची चांदणी इतकी तेजस्वी का?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पहाटेच्या किंवा संधिप्रकाशाच्या निरभ्र आकाशात नजर टाकल्यास सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो म्हणजे ‘शुक्र’ ग्रह. शुक्राची चांदणी प्राचीन काळापासूनच लोकांचे लक्ष वेधून घेत आलेली आहे. चंद्रापाठोपाठ रात्रीच्या आकाशातील ही दुसरी सर्वात तेजस्वी वस्तू आहे. पण, शुक्र इतका लख्ख का चमकतो? यामागील शास्त्रीय कारणांचा उलगडा संशोधकांनी केला आहे.

IAU च्या ‘सेंटर फॉर प्रोटेक्शन ऑफ द डार्क अँड क्वाइट स्काय’चे संशोधक अँथनी मालामा यांच्या मते, शुक्र हा पहिल्या प्रतीच्या तार्‍यांपेक्षा सुमारे 100 पट अधिक तेजस्वी आहे. खगोलशास्त्रातील मापनानुसार, सर्वात तेजस्वी समजल्या जाणार्‍या ‘सीरियस’ तार्‍याची चमक -1.47 आहे, तर शुक्राची चमक -4.14 इतकी प्रचंड आहे. शुक्राच्या या तेजाचे मुख्य कारण म्हणजे त्याचा उच्च ‘अल्बेडो’. अल्बेडो म्हणजे एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणार्‍या प्रकाशाचे प्रमाण. शुक्र हा ग्रह स्वतःवर पडणार्‍या सूर्यप्रकाशापैकी 76 टक्के प्रकाश पुन्हा अंतराळात परावर्तित करतो.

पृथ्वी केवळ 30 टक्के प्रकाश परावर्तित करते. चंद्राचा अल्बेडो अत्यंत कमी असून, तो फक्त 7 टक्के प्रकाश परावर्तित करतो. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनचे शास्त्रज्ञ संजय लिमये यांनी सांगितले की, शुक्राभोवती असलेल्या ढगांच्या जाड थरामुळे हा उच्च अल्बेडो निर्माण होतो. शुक्राच्या पृष्ठभागापासून 48 ते 70 किलोमीटर उंचीवर सल्फ्यूरिक अ‍ॅसिडच्या थेंबांचे ढग आहेत. हे थेंब अतिशय सूक्ष्म (बॅक्टेरियाच्या आकाराचे) असून ते सूर्यप्रकाश अत्यंत कार्यक्षमतेने विखुरतात, ज्यामुळे ग्रह तेजस्वी दिसतो.

शनीचा चंद्र ‘एन्सेलाडस’ याचा अल्बेडो 0.8 (80%) असून, तो शुक्रापेक्षाही अधिक चमकदार आहे. परंतु, पृथ्वीवरून तो शुक्रासारखा दिसत नाही. याचे कारण म्हणजे त्याचे सूर्यापासूनचे अंतर. शुक्र सूर्यापासून जवळ असल्याने त्याला एन्सेलाडसच्या तुलनेत 176 पट अधिक तीव्र सूर्यप्रकाश मिळतो. शुक्राच्या प्रखरतेचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे पृथ्वीपासूनचे कमी अंतर आणि त्याचा आकार. जरी बुध ग्रह कधीकधी पृथ्वीच्या अधिक जवळ येत असला, तरी शुक्राचा आकार मोठा असल्याने तो रात्रीच्या आकाशात अधिक प्रभावी आणि तेजस्वी दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT