Venus vs Mercury | ‘बुध’ सूर्याच्या अधिक जवळ असूनही ‘शुक्र’ जास्त उष्ण का? Olivia Maule
विश्वसंचार

Venus vs Mercury | ‘बुध’ सूर्याच्या अधिक जवळ असूनही ‘शुक्र’ जास्त उष्ण का?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : बुध सूर्याच्या सर्वात जवळ असूनही शुक्र हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह का आहे? सूर्यमालेतील ग्रहांचा विचार केल्यास, सूर्याच्या सर्वात जवळ असलेला बुध हा सर्वात उष्ण ग्रह असायला हवा, असा सामान्य अंदाज असतो. सूर्याच्या बाजूकडील बुध ग्रहाचे तापमान सुमारे ४३० अंश सेल्सिअस (८०० अंश फॅरेनहाईट) पर्यंत जाते, जे शिसे वितळवण्यासाठी पुरेसे आहे. तरीही, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह बुध नसून शुक्र हा आहे. शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान रात्र असो वा दिवस, सातत्याने ४६४ अंश सेल्सिअस (८६७ अंश फॅरेनहाइट) च्या आसपास असते.

यामागील मुख्य कारण म्हणजे दोन्ही ग्रहांचे वातावरण (Atmosphere) आणि तेथील ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ आहे. परंतु, त्यावर कोणतेही दाट वातावरण नाही (तेथे केवळ अत्यंत विरळ वायूंचा थर आहे). जेव्हा सूर्यकिरण बुधाच्या पृष्ठभागावर पडतात, तेव्हा पृष्ठभाग तापतो; पण वातावरण नसल्यामुळे ही सर्व उष्णता रात्रीच्या वेळी थेट अंतराळात निघून जाते. त्यामुळे बुधाच्या अंधाऱ्या बाजूचे तापमान उणे १८० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. शुक्र ग्रहावर कार्बन डायऑक्साईडने बनलेले अत्यंत दाट वातावरण आहे. शुक्राच्या वातावरणात सुमारे ९६ टक्के कार्बन डायऑक्साईड वायू आहे. शुक्रावरील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या सागरी पृष्ठभागावरील दाबापेक्षा तब्बल ९० पट जास्त आहे.

जेव्हा सूर्यप्रकाश शुक्राच्या दाट वातावरणातून आत येतो, तेव्हा पृष्ठभाग गरम होतो आणि इन्फ्रारेड किरणोत्सर्गाच्या स्वरूपात उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु, कार्बन डायऑक्साईडचे दाट थर या उष्णतेला बाहेर पडू देत नाहीत आणि ग्रहाच्या आतच अडकवून ठेवतात. ही प्रक्रिया एखाद्या जाड घोंगडीप्रमाणे काम करते. शास्त्रज्ञांच्या मते, अब्जावधी वर्षांपूर्वी शुक्रावरही पृथ्वीप्रमाणे पाणी असण्याची शक्यता होती. परंतु, सूर्य जसजसा अधिक प्रखर होत गेला, तसतसे शुक्रावरील पाण्याचे बाष्पीभवन झाले. पाणी आणि खडक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात; पण पाणी संपल्यामुळे संपूर्ण कार्बन डायऑक्साईड वातावरणात जमा झाला. या वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडमुळे उष्णता अजून वाढली आणि एक चक्र तयार झाले, ज्याला ‘रनअवे ग्रीनहाऊस इफेक्ट’ म्हणतात. थोडक्यात काय? बुध ग्रहाकडे उष्णता धरून ठेवण्यासाठी वातावरण नाही, तर शुक्र ग्रहाकडे उष्णता रोखणारे कार्बन डायऑक्साईडचे अत्यंत दाट आवरण आहे. म्हणूनच, सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असूनही शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT