अदीस अबाबा : उंटाला ‘वाळवंटाचे जहाज’ म्हटले जाते. मात्र, जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या तापमानाचा फटका आता या अत्यंत दणकट प्राण्यालाही बसत आहे. भारताच्या राजस्थानमधील थर वाळवंटापासून ते आफ्रिकेतील सहारा वाळवंटापर्यंत प्रचंड उष्णतेमुळे उंटांचा मृत्यू होत आहे. आफ्रिकेतील वाळवंटी भागात शतकानुशतके मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग असलेले उंट आता हळूहळू गायब होऊ लागले आहेत. २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, वाढते तापमान आणि हवामान बदलाचा उंटांच्या आरोग्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे.
जगातील सर्वात जास्त एका वशिंडाचे उंट उत्तर आफ्रिका आणि ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ भागात आढळतात. इथिओपियातील अफार प्रदेशात भटकंती करणारे लोक मिठाची वाहतूक करण्यासाठी उंटांच्या तांड्यांचा वापर करतात. अफारमधील सोमेरा येथील ५०० उंटांचे मालक अली उमर यांनी सांगितले की, भीषण उष्णतेमुळे त्यांनी एका महिन्यात उंटांची अनेक पिल्ले गमावली आहेत. उन्हाचा तडाखा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या २०२५ मधील अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे उंटांचे आरोग्य, त्यांची दूध उत्पादकता आणि पुनरुत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच जून २०२५ मधील एका संशोधनानुसार, शेजारील सोमालिया देशात भीषण दुष्काळामुळे उंटांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असून, तिथे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
उंटांचे हे संकट केवळ आफ्रिकेपुरते मर्यादित नसून भारताच्या थर वाळवंटातही त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. राजस्थानमध्ये उंटांच्या संख्येत वेगाने घट झाली आहे; मात्र भारतातील या संकटाचे कारण थोडे वेगळे आहे. ‘अरब न्यूज’च्या अहवालानुसार, थर भागातील नव्या पिढीचा उंट पाळण्यातील रस खूप कमी झाला आहे. भारतात सर्वाधिक उंट राजस्थानमध्येच आहेत. परंतु, गेल्या एका दशकात त्यांची संख्या सुमारे ७० टक्क्यांनी घटली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१२ मधील उंटांची संख्या सुमारे ७,४६,००० होती. ती २०२५ मध्ये घटून केवळ २,१३,००० झाली आहे.