गंगोत्री हिमनदी नेहमीपेक्षा लवकर का वितळत आहे?  
विश्वसंचार

गंगोत्री हिमनदी नेहमीपेक्षा लवकर का वितळत आहे?

हवामान बदलामुळे जलचक्रात बदल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिमालयातील गंगोत्री हिमनदी, जी गंगेच्या मुख्य प्रवाहाचे उगमस्थान आहे, ती नेहमीपेक्षा जास्त वेगाने वितळत आहे. एका नवीन संशोधनानुसार, हवामान बदलामुळे गंगोत्री हिमनदी प्रणालीच्या (जीजीएस) जलचक्रात मोठे बदल झाले आहेत, ज्यामुळे या हिमनदीवरील आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या भागांवर गंभीर परिणाम होत आहेत.

जलचक्रात होणारे बदल

एका ताज्या अभ्यासामध्ये, शास्त्रज्ञांनी गेल्या चार दशकांतील (1980-2020) गंगोत्री हिमनदीच्या जल प्रवाहाचे विश्लेषण केले. या अभ्यासानुसार काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. पूर्वी हिवाळ्यात बर्फवृष्टी होऊन उन्हाळ्यात ती हळूहळू वितळत असे; पण आता वाढलेल्या तापमानामुळे आणि अनियमित पर्जन्यमानामुळे बर्फ लवकर वितळत आहे. त्यामुळे भागीरथी नदीतील पाण्याचा प्रवाह लवकर सुरू होत आहे. 1990 नंतर सर्वाधिक पाण्याचा प्रवाह ऑगस्टऐवजी जुलै महिन्यात दिसून येत आहे. हिवाळ्यात होणार्‍या बर्फवृष्टीचे प्रमाण कमी झाले आहे, तर पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हिमनदीवर साठलेला बर्फ कमी होत आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे तत्काळ प्रवाह वाढत आहे. गेल्या 40 वर्षांच्या अभ्यासानुसार, गंगोत्री हिमनदीच्या एकूण प्रवाहापैकी 64 टक्के वाटा बर्फ वितळल्यामुळे, 21 टक्के हिमनदी वितळल्यामुळे, 11 टक्के पावसाच्या प्रवाहामुळे आणि 4 टक्के भूजल प्रवाहामुळे होता; मात्र बर्फ वितळण्याचा वाटा हळूहळू कमी होत आहे, तर पावसाच्या आणि भूजल प्रवाहाचा वाटा वाढत आहे.

या बदलांचे दूरगामी परिणाम

गंगोत्री हिमनदीच्या जलचक्रात होणारे हे बदल गंभीर धोके निर्माण करत आहेत. यामुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता, जलविद्युत निर्मिती आणि कृषी क्षेत्रासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. लवकर बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी आणि शरद ऋतूमध्ये नद्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. हे संशोधनावरुन हे स्पष्ट होते की, गंगोत्री हिमनदी केवळ वितळतच नाही, तर हवामान बदलामुळे तिच्या नैसर्गिक जलचक्रातही मोठे बदल होत आहेत. याचा परिणाम केवळ हिमालयातील परिसंस्थेवरच नव्हे, तर गंगेच्या खोर्‍यातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावरही होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT