वॉशिंग्टन : १९९० च्या दशकाच्या मध्यापासून पन्नाशीखालील वयोगटातील लोकांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचे (कोलोरेक्टल कॅन्सर) प्रमाण सातत्याने वाढत आहे. वयोवृद्धांमधील कर्करोगाच्या तुलनेत तरुणांमधील हा कर्करोग अधिक आक्रमक आणि उपचारांना दाद न देणारा असतो. आता शास्त्रज्ञांना यामागचे नेमके कारण समजले असण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (२९ ऑक्टोबर) ‘नेचर मेडिसीन’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात, २९ वर्षांपासून ते ९० वर्षांवरील लोकांच्या कोलोरेक्टल ट्यूमरची (गाठींची) तुलना करण्यात आली. या अभ्यासात तरुण आणि वृद्ध रुग्णांमधील कर्करोगाच्या गाठींमधील महत्त्वाचे फरक समोर आले आहेत. या नवीन संशोधनामुळे शास्त्रज्ञांना तरुणांमधील आतड्याच्या कर्करोगाशी मुकाबला करण्याचे नवीन मार्ग शोधण्यात मदत होऊ शकते, असे या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या न्यूरोलॉजीच्या प्राध्यापिका ॲना अँडरसन यांनी सांगितले.
‘माझा विश्वास आहे की, आमचा हा अभ्यास या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरत आहे,’ असे अँडरसन यांनी ‘लाईव्ह सायन्स’शी बोलताना सांगितले. ‘कारण, आतापर्यंत आपल्याकडे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त होते.’ वयोवृद्धांमधील हा आजार कमी होत असताना, पन्नाशीखालील लोकांमध्ये मात्र तो वाढताना दिसत असल्याने या early-onset (लवकर उद्भवणार्या) कोलोरेक्टल कॅन्सरबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अमेरिकेत पन्नाशीखालील वयोगटातील लोकांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे हे सध्या प्रमुख कारण बनले आहे आणि लहान मुलांमध्ये व किशोरवयीन मुलांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे. या वाढीमागचे नेमके कारण काय, याशिवाय तरुणांमध्ये हा आजार इतका जीवघेणा का ठरतो, हे आणखी एक गूढ होते. अँडरसन म्हणाल्या, ‘क्लिनिकल डेटावरून असे दिसून येते की, तरुण रुग्णांमधील हा आजार एकूणच अधिक आक्रमक असतो.
इतर प्रकृतीने उत्तम आरोग्य असणारे हे तरुण रुग्ण उपचारांना चांगला प्रतिसाद देत नाहीत.’ या रहस्याचा उलगडा करण्यासाठी, ॲना अँडरसन यांनी डाॅणा-फार्बर कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ऑन्कोलॉजिस्ट डॉ. किम्मी एनजी आणि ब्रॉड इन्स्टिट्यूट व मास जनरल ब्रिघमचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रामनिक झेवियर यांच्याशी सहयोग केला. त्यांनी पेशींमधील आरएनए (RNA) विश्लेषणाच्या पद्धतीचा वापर केला, ज्यामुळे त्यांना गोठवलेल्या आणि संग्रहित केलेल्या ट्यूमरच्या ऊतींवर (tissues) काम करणे शक्य झाले. ‘डीएनए’चा जवळचा संबंध असणारा ‘आरएनए’, पेशींमध्ये सक्रिय असणारी जनुके दर्शवतो. एकूण संशोधन पथकाने १८९ ट्यूमरचे विश्लेषण केले; ज्यामध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे ५४ आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचे १३५ नमुने समाविष्ट होते. इतक्या मोठ्या प्रमाणातील नमुन्यांमुळे संशोधकांना केवळ तरुण आणि वृद्ध गटांमधील ट्यूमरची ढोबळमानाने तुलना करण्याऐवजी, प्रत्येक वयोगटाशी जोडलेल्या सूक्ष्म फरकांचा अभ्यास करणे शक्य झाले.
यामुळे त्यांना अतिशय बारकाईने फरक शोधून काढता आले, असे अँडरसन यांनी स्पष्ट केले. ट्यूमरमधील जनुक सक्रियतेच्या (gene activity) पॅटर्नच्या आधारे, संशोधकांना असा संशय आहे की, तरुण रुग्णांच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये पेशी-ते-पेशी संवादाशी (cell-to-cell communication) संबंधित एक वेगळी सक्रियतादेखील दिसून येते. यामुळे या पेशी वृद्ध रुग्णांमधील कर्करोगाच्या पेशींच्या तुलनेत शरीरात अधिक सहजतेने पसरू शकतात. इतर प्रकारच्या कर्करोगांमध्ये, या प्रकारची जनुक सक्रियता अधिक आक्रमक ट्यूमरशी आणि आजार पसरण्याची किंवा ‘मेटास्टॅसाईज’ होण्याची वाढीव शक्यता यांच्याशी जोडलेली असते, असे अँडरसन यांनी सांगितले.