Lake Hillier pink lake | ऑस्ट्रेलियातील ‘लेक हिलियर’चे पाणी गुलाबी का आहे? 
विश्वसंचार

Lake Hillier pink lake | ऑस्ट्रेलियातील ‘लेक हिलियर’चे पाणी गुलाबी का आहे?

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : एका बाजूला गडद निळा समुद्र, सभोवताली दाट हिरवेगार जंगल आणि अगदी मध्यभागी ‘बबल गम’सारखे दिसणारे एक विशाल गुलाबी सरोवर! हे एखाद्या फँटसी चित्रपटातील द़ृश्य वाटत असले तरी, पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ‘मिडल आयलँड’वर स्थित ‘लेक हिलियर’चे हे वास्तव आहे.

जगातील सर्वात सुंदर सरोवरांपैकी एक असलेले हे सरोवर आपल्या चटक गुलाबी रंगासाठी जगभर प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाणी निळे असताना या सरोवराचा रंग गुलाबी कसा झाला? यामागचे वैज्ञानिक रहस्य आता उलगडले आहे. लेक हिलियरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जर या सरोवराचे पाणी एका पेल्यात काढले तरी त्याचा रंग गुलाबीच राहतो. आधुनिक ‘मेटाजेनोमिक सिक्वेन्सिंग’ तंत्रज्ञानामुळे या रंगामागील सूक्ष्मजीव सृष्टीचा खुलासा झाला आहे. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत : ड्युनेलिएला सलीना (Dunaliella Salina): हे एक प्रकारचे सूक्ष्म शेवाळ असून ते अतिशय खार्‍या पाण्यात वाढते.

ऊर्जा शोषण्यासाठी हे शेवाळ ‘कॅरोटीनॉईड’ तयार करते, ज्यामुळे पाण्याला लाल-गुलाबी रंग प्राप्त होतो. हॅलोफाईल्स (Halophiles) : या पाण्यात ‘सलीनीबॅक्टर रूबर’सारखे बॅक्टेरिया आणि विशिष्ट प्रजातीचे जीव आढळतात. या जीवांच्या शरीरातील लाल रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग अधिक गडद होतो. संपूर्ण इकोसिस्टम : संशोधनानुसार, येथे केवळ एकच जीव नाही, तर बॅक्टेरिया, शेवाळ आणि व्हायरसची एक संपूर्ण परिसंस्था कार्यरत आहे. हे जीव अशा अति-क्षारयुक्त वातावरणात केवळ जिवंत राहत नाहीत, तर रंगीत रंगद्रव्येही सोडतात. तांत्रिकद़ृष्ट्या लेक हिलियरचे पाणी विषारी नाही. या पाण्यात मिठाचे प्रमाण जास्त असल्याने येथे पोहणे हे ‘मृत समुद्रातील’ पोहण्यासारखे असेल. मात्र, प्रशासनाने येथे पोहण्यास मज्जाव केला आहे.

सरोवराच्या नाजूक परिसंस्थेचे जतन करण्यासाठी पर्यटकांना येथे जाण्याची परवानगी नाही. तसेच, मिडल आयलँडपर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्याने तिथे पोहोचणे अत्यंत कठीण आहे. या सरोवराचे सौंदर्य पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ‘सीनिक फ्लाईट’. एस्पेरन्स शहरातून विमानाने उड्डाण करून पर्यटक या सरोवराचे विलोभनीय द़ृश्य पाहू शकतात. उंचावरून दिसणारी जंगलाची हिरवळ, समुद्राचा निळेपणा आणि सरोवराचा गुलाबी रंग यांचा संगम एक अविस्मरणीय अनुभव देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT