Human Chin | मानवाकडेच का आहे ‘हनुवटी’? 
विश्वसंचार

Human Chin | मानवाकडेच का आहे ‘हनुवटी’?

उत्क्रांतीमधील हा एक ‘अपघात’ असल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध गुप्तहेर सॅम स्पेड असो वा सामान्य माणूस, प्रत्येकाच्या चेहर्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘हनुवटी’; पण तुम्हाला माहीत आहे का? संपूर्ण प्राणीसृष्टीत केवळ मानवाकडेच हनुवटी असते. आपले जवळचे नातेवाईक मानले जाणारे चिम्पांझी, तसेच आपले पूर्वज निअँडरथल किंवा डेनिसोव्हन्स यांच्याकडेही हनुवटी नव्हती. ‘पीएलओएस वन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, मानवी हनुवटी ही कोणत्याही विशिष्ट गरजेतून निर्माण झालेली नसून, ती उत्क्रांतीचा एक ‘योगायोग’ किंवा ‘बायप्रोडक्ट’ आहे.

सोप्या भाषेत सांगायचे, तर खालच्या जबड्याच्या हाडाचा बाहेर आलेला भाग म्हणजे हनुवटी. जीवाश्म विज्ञानात ‘होमो सेपियन्स’ म्हणजेच आधुनिक मानवाला ओळखण्यासाठी हनुवटी हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले जाते. युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोमधील मानववंशशास्त्रज्ञ डॉ. नोरिन वॉन क्रॅमन-तौबाडेल यांच्या मते, हनुवटी ही ‘थेट निवडीतून’ (Direct selection) तयार झालेली नाही. त्यांनी याला ‘स्पँड्रेल’ असे संबोधले आहे. उदाहरणावरून समजून घ्या : ज्याप्रमाणे घरामध्ये एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी आपण जिना बांधतो, तेव्हा जिन्याच्या खाली रिकामी जागा आपोआप तयार होते.

त्या जागेचा कोणताही वास्तुशास्त्रीय उद्देश नसतो, तो जिन्याचा एक ‘बायप्रोडक्ट’ असतो. अगदी त्याचप्रमाणे, मानवी कवटीच्या इतर भागांमध्ये (उदा. जबडा लहान होणे) झालेल्या बदलांमुळे हनुवटीचा हा भाग आपोआप बाहेर डोकावू लागला. यापूर्वी असे मानले जात असे की, अन्नाचे चघळणे सोपे व्हावे किंवा जबड्याला बळकटी मिळावी म्हणून निसर्गाने हनुवटीची निवड केली असावी. मात्र, डॉ. नोरिन यांच्या मते, ‘हनुवटी असण्यामागे कोणताही कार्यात्मक (Functional) उद्देश नाही. हा केवळ एक बाजूचा परिणाम (Side product) आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT