म्युन्स्टर (जर्मनी) : हृदयविकाराचा झटका रात्रीपेक्षा दिवसा आल्यास हृदयाचे जास्त नुकसान करतो, असे निरीक्षण हृदयरोगतज्ज्ञ दशकांपासून नोंदवत आहेत. मात्र, असे नेमके का घडते? याचे रहस्य आता शास्त्रज्ञांनी उलगडले असून, हे संशोधन हृदयविकाराच्या उपचारात क्रांती घडवून आणू शकते.
दिवसा येणारा हृदयविकाराचा झटका अधिक गंभीर का असतो, याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. काही तज्ज्ञ याला ताण देणारे हार्मोन्स आणि रक्तदाबातील चढ-उतार जबाबदार मानतात. मात्र, ‘जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसिन’ मध्ये 12 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासानुसार, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती, विशेषतः ‘न्यूट्रोफिल्स’ नावाच्या पेशी यात महत्त्वाची भूमिका बजावतात. न्यूट्रोफिल्स या शरीरातील अशा पेशी आहेत, ज्या जखम झाल्यावर प्रथम तिथे पोहोचतात. संशोधनात असे आढळले आहे की, दिवसा या पेशी अत्यंत आक्रमक असतात, ज्यामुळे जखमेच्या ठिकाणी जास्त जळजळ आणि ऊतींचे नुकसान होते.
2,000 पेक्षा जास्त रुग्णांच्या नोंदी तपासल्यानंतर शास्त्रज्ञांना असे आढळले की, दिवसा भरती झालेल्या रुग्णांमध्ये न्यूट्रोफिल्सची संख्या जास्त होती आणि त्यांच्या हृदयाचे नुकसानही अधिक झाले होते. हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केले. त्यांनी उंदरांचे दोन गट केले: 1. सामान्य गट : ज्यांच्या शरीरात न्यूट्रोफिल्सचे प्रमाण नैसर्गिक होते. 2. प्रायोगिक गट: ज्यांच्या शरीरातील न्यूट्रोफिल्स औषधांद्वारे कमी करण्यात आले होते.
ज्या उंदरांमध्ये न्यूट्रोफिल्स कमी होते, त्यांच्यामध्ये दिवसा आणि रात्री येणार्या झटक्यांमधील फरक संपुष्टात आला आणि हृदयाचे एकूण नुकसानही कमी झाले. तसेच, शरीरातील 24 तासांचे चक्र नियंत्रित करणार्या ‘सर्केडियन क्लॉक’ जनुकामध्ये बदल केल्यावरही हृदयाचे नुकसान कमी झाल्याचे दिसून आले. या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, रोगप्रतिकारक शक्तीला पूर्णपणे कमकुवत न करता केवळ ‘क्लॉक जीन’मध्ये बदल करून हृदयविकाराचे नुकसान कमी करता येऊ शकते.