Space Data Centers | अंतराळात डेटा सेंटर उभारण्याची शर्यत का सुरू झाली?  
विश्वसंचार

Space Data Centers | अंतराळात डेटा सेंटर उभारण्याची शर्यत का सुरू झाली?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सध्या पृथ्वीवर डेटा सेंटर्सचे फायदे आणि तोटे यावरून मोठी चर्चा सुरू आहे. एकीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) च्या विकासासाठी डेटा सेंटर अत्यंत महत्त्वाचे मानून त्यासाठी जमीन आणि संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत; तर दुसरीकडे या डेटा सेंटर्समुळे होणारा नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि विशेषतः पाण्याचा होणारा बेसुमार वापर याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, आता एका प्रसिद्ध कंपनीने डेटा सेंटर थेट अंतराळात हलवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) साहाय्याने ते अखंडपणे चालवले जाऊ शकतील. ही योजना याच आठवड्यात प्रत्यक्षात उतरणार आहे.

अंतराळात डेटा सेंटर उभारण्याचा हा प्रयोग अल्फाबेटची उपकंपनी गूगल करत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ एक कल्पना मानल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाला सत्यतेत उतरवण्यासाठी गूगलने पावले उचलली आहेत. अब्जावधी डॉलर्सचा हा संशोधन कार्यक्रम यशस्वी झाल्यास, आज पृथ्वीवर चाललेली डेटा सेंटर उभारण्याची शर्यत येत्या काळात अंतराळात पाहायला मिळू शकते. गूगलच्या अंतराळात एआय डेटा सेंटर उभारण्याच्या या योजनेचे नाव ‘प्रोजेक्ट सनकॅचर’ असे आहे. या दीर्घकालीन संशोधनाचा मुख्य उद्देश पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सौरऊर्जेवर चालणारे एआय डेटा सेंटर तैनात करणे हा आहे.

अंतराळात जवळजवळ २४ तास सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्यामुळे अंतराळात डेटा सेंटर उभारल्यास पृथ्वीवरील विजेची प्रचंड खपत, पाण्याची नासाडी आणि पर्यावरणाला होणारा धोका या सर्व समस्यांपासून मोठा दिलासा मिळू शकतो. अंतराळातील व्हॅक्यूममध्ये (पोकळीत) हवा नसल्यामुळे पारंपरिक कूलिंग फॅन काम करत नाहीत. एआय चिप्स प्रोसेसिंग दरम्यान प्रचंड उष्णता निर्माण करतात. त्यातच सूर्याच्या थेट प्रकाशामुळे उपग्रहांमध्येही उष्णता निर्माण होते, जी बाहेर काढणे मोठे आव्हान आहे.

अंतराळात डेटा सेंटर पाठवणे आणि स्थापित करणे अत्यंत महागडे आहे. उदाहरणार्थ, अंतराळात १-गीगावॉटचे डेटा सेंटर उभारण्याचा अंदाजे खर्च ५१.५ अब्ज डॉलर आहे, तर पृथ्वीवर त्यासाठी १६ अब्ज डॉलर खर्च येतो. रॉकेट लॉन्चिंगचा खर्च कमी होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या परवडणारा नाही. अंतराळातील उपग्रहाचा एखादा हार्डवेअर भाग किंवा चिप खराब झाल्यास तिथे जाऊन दुरुस्ती करणे अशक्य आहे. याशिवाय, एवढे मोठे डेटा सेंटर अंतराळात रोबोच्या मदतीने टप्प्याटप्प्याने जोडावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT