नवी दिल्ली ः शेंगदाण्याला ‘गरिबांचे काजू’ असेही म्हटले जाते. चविष्ट असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहेत. प्रोटिन, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले शेंगदाणे हिवाळ्यात ‘सुपरफूड’ ठरतात, असे तज्ज्ञ सांगतात.
शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटस् असतात, जे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. शेंगदाणे वजन कमी करण्यासाठीही मदत करू शकतात. यात प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे अवाजवी खाण्यावर नियंत्रण राहते. शेंगदाणे टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात. तसेच, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी याला ‘सुपरफूड’ मानले जाते. शेंगदाणे हा कॅलरी आणि प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे.
जर तुम्हाला वारंवार थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर स्नॅक्स म्हणून शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन-ई, फोलेट आणि रायबोफ्लेविन आढळतात. हे घटक मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याच्या नियमित सेवनाने एकाग्रता सुधारते. हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी शेंगदाणे अत्यंत फायदेशीर मानले जातात. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस वाढत्या वयानुसार हाडांमध्ये येणारा ठिसूळपणा रोखण्यास मदत करतात.
हिवाळ्यात अनेकदा हात-पाय किंवा चेहर्यावर सूज येते. शेंगदाण्यामध्ये फायबर, कॉपर, मॅग्नेशियम आणि पॉलीफेनॉल असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. शेंगदाणे व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-बी, झिंक आणि अँटीऑक्सिडंटस्नी भरपूर असतात. हे सर्व घटक तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातील संसर्गापासून शरीराचे रक्षण होते.