लंडनः आपला लाडका कुत्रा किंवा मांजर बागेत फिरताना अचानक गवत खायला लागतं, असं द़ृश्य तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मांसाहारी असलेले हे प्राणी असं शाकाहारी प्राण्यांसारखं का वागतात, असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. पोट बिघडल्यामुळे प्राणी गवत खातात, असा एक सर्वसामान्य समज आहे. मात्र, यामागे काही वेगळी आणि रंजक कारणं असू शकतात, असं नवीन संशोधन सांगतं. चला तर मग, यामागचं विज्ञान समजून घेऊया.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा पाळीव प्राण्यांना पोटात अस्वस्थ वाटतं, तेव्हा ते बरे होण्यासाठी गवत खातात. न्यूयॉर्कमधील स्टॅक व्हॅटरनरी हॉस्पिटलच्या पशुवैद्यक डॉ. जेमी लव्हजॉय यांच्या मते, ‘हा एक जुना समज आहे. कुत्रा आणि मांजर या दोन्ही प्राण्यांमध्ये गवत पचवण्यासाठी आवश्यक असलेली पाचक प्रणाली नसते.’ गवत पचवण्यासाठी विशेष जीवाणू (बॅक्टेरिया) आणि अनेक कप्प्यांचे पोट आवश्यक असते, जे या प्राण्यांमध्ये नसते. त्यामुळे ते खाल्लेलं गवत न पचताच उलट्यामधून किंवा विष्ठेद्वारे बाहेर पडतं.
या सिद्धांताला शास्त्रीय आधार कमी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. बहुतेक प्राणी पोटदुखीमुळे नव्हे, तर इतर कारणांमुळे गवत खातात. शास्त्रज्ञांच्या मते, पाळीव प्राण्यांचे गवत खाणे ही एक नैसर्गिक आणि जन्मजात सवय असू शकते, जी त्यांना त्यांच्या जंगली पूर्वजांकडून मिळाली आहे. जंगली कुत्रे (लांडगे) आणि मांजरीसुद्धा गवत खातात, असं निरीक्षणात आढळलं आहे. यामागील मुख्य सिद्धांत असा आहे की, जंगली प्राणी आपल्या आतड्यांमधील परजीवी किंवा जंत बाहेर काढण्यासाठी गवत खायचे. गवत न पचल्यामुळे ते आतड्यांमधून सरळ पुढे सरकतं आणि आपल्यासोबत परजीवींनाही शरीराबाहेर ढकलतं. जरी आजच्या पाळीव प्राण्यांच्या आहारात परजीवींचा धोका कमी असला, तरी त्यांच्यातील ही मूळ सवय अजूनही कायम आहे.