वॉशिंग्टन : राग आल्यावर चेहरा लाल होतो, हे फक्त एक म्हण नसून त्यामागे संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हार्मोन्सच्या स्रावामुळे आणि रक्तप्रवाह वाढल्यामुळे हा परिणाम दिसतो. म्हणूनच ‘रागाने लाल होणे’ हा समज किंवा केवळ वाक्प्रचार नसून, मानवी शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, असे एका संशोधनातून आढळून आले आहे. तसे पाहता, राग ही मानवी मनाची एक विशेष अवस्था आहे. ही भावना सहजासहजी निर्माण होत नाही. ती विशिष्ट परिस्थितीतच उमटते आणि फक्त माणसांमध्येच नाही, तर प्राण्यांमध्येही दिसून येते. सहसा राग हा अस्तित्वाच्या धोक्याशी संबंधित असतो. कोणीतरी आपल्याला त्रास दिला, अपमान केला किंवा एखादी गोष्ट मनासारखी मिळाली नाही, तर राग निर्माण होतो.
शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांपासून भावना आणि रंग यांचा संबंध जोडला आहे. जरी लाल रंग हा रक्ताचा रंग असला, तरी तो धोक्याशीही जोडला जातो. याउलट, हिरवा रंग शांततेचा आणि समाधानाचा प्रतीक मानला जातो. विशेष म्हणजे माणसाचे डोळे हिरवा रंग सहज ओळखतात, पण लाल रंग पाहिल्यावर अस्वस्थता जाणवते. लाल रंग अस्वस्थता निर्माण करतो आणि तो पाहिल्यावर नकळत मेंदूला धोक्याची जाणीव होते. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे रक्तस्राव. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये लाल रंग हा हळूहळू धोक्याचे प्रतीक बनला. रक्त हा शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचे बाहेर येणं म्हणजे शरीराला धोका आहे, ही भावना मेंदूत खोलवर रुजली आहे. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा माणसाला राग येतो, तेव्हा त्याच्या शरीरात ‘फाईट ऑर फ्लाईट’ म्हणजेच लढा किंवा पळून जा, ही प्रतिक्रिया सक्रिय होते. यावेळी शरीरात अॅड्रेनलिन आणि इतर तणाव हार्मोन्स स्रवतात.
रागाच्या क्षणी शरीराचा रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्या रुंदावतात. विशेषतः चेहर्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे चेहरा लालसर दिसतो. याशिवाय, हृदय वेगाने धडधडू लागते आणि रक्त वेगाने फिरते. त्यामुळे चेहर्याला अधिक रक्तपुरवठा होतो आणि चेहरा अधिक लालसर होतो. रागाच्या वेळी शरीराचे तापमानही वाढते. यामुळे शरीरात उष्णतेची भावना निर्माण होते. ही उष्णता आणि रक्तप्रवाह वाढल्यामुळे चेहरा अधिक लालसर दिसतो. म्हणूनच, राग आल्यावर चेहरा लाल होणे हा केवळ एक समज नाही, तर त्यामागे ठोस वैज्ञानिक कारण आहे.