शस्त्र लागतेच कशाला? Pudhari File Photo
विश्वसंचार

शस्त्र लागतेच कशाला?

आजकाल पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर बाळगणे हे स्वसंरक्षणापेक्षा प्रतिष्ठेचे मानले जात आहे

पुढारी वृत्तसेवा

आपल्या देशात शस्त्राची विशेषत: पिस्तूलसारख्या शस्त्राची खुलेआम विक्री आणि खरेदी करता येत नाही. कुणालाही पिस्तूलसारखे शस्त्र स्वतःच्या संरक्षणासाठी बाळगायचे असेल तर शासकीय परवाना घ्यावा लागतो. शासकीय परवाना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा खरेच या व्यक्तीला पिस्तुलाची गरज आहे का याची शहानिशा करते आणि मगच परवाना दिला जातो. आजकाल पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर बाळगणे हे स्वसंरक्षणापेक्षा प्रतिष्ठेचे मानले जात आहे. घर आहे, बंगला आहे, गाडी आहे किंवा गाड्या आहेत, तसेच कुत्रे-घोडे पाळले आहेत. परंतु तुमच्याकडे रिव्हॉल्व्हर नसेल तर तुमची प्रतिष्ठा शून्य आहे. भरपूर पैसे आले की शस्त्र हाती असावे, असे बर्‍याचजणांना वाटत असते.

पुण्यामध्येच नुकताच एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या गाडीवर गोळीबार झाला. कुणालाही गोळी लागली नाही किंवा संबंधित व्यक्तीसुद्धा सुरक्षित होती. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केला असता हा गोळीबार त्याच व्यक्तीने घडवून आणला असे निदर्शनास आले आहे. झाले असे की, हा कार्यकर्ता कम नेता बर्‍याच दिवसांपासून शस्त्र परवाना मिळण्यासाठी प्रयत्न करत होता. याला काही संरक्षणाची गरज नाही, असा शेरा मारत त्याला शस्त्र परवाना नाकारला जात होता. काहीही करीन, परंतु मनातले प्रत्यक्षात आणीनच, अशी जिद्द असलेले अनेक कार्यकर्ते राजकारणामध्ये आहेत. त्यापैकीच हा एक. आपली मागणी किती रास्त आहे हे पोलिसांना पटवून देण्यासाठी त्याने स्वतःच्याच गाडीवर गोळीबार करवून घेतला.

आता माझ्यावर गोळीबार झाला, आता तरी मला शस्त्र द्या, असे तो प्रशासनाला विनवत होता. पोलिसांच्या तपासात त्याचे बिंग फुटले आणि हा गोळीबार त्यानेच घडवून आणला असे निष्पन्न झाले. शस्त्र परवाना दूरच, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याची चौकशी सुरू आहे. आपण सामान्य लोक महागाई, मुलांच्या वाढलेल्या फी, वाढत असलेले विविध प्रकारचे टॅक्स याबरोबर रात्रंदिन लढत असतो. या आपल्या सामान्य लोकांच्या लढाईमध्ये आपल्याला कुठल्याही संरक्षणाची गरज नसते. मोठ्या लोकांचे मात्र वेगळे असते.

त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो. ते अनेक ठिकाणी नको त्या भानगडी करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो आणि जीवाला धोका निर्माण झाला तर आपल्या जवळ शस्त्र असले पाहिजे ही एक नवीनच संस्कृती आपल्या देशात किंबहुना राज्यात उदयाला येत आहे ही काळजी वाटण्यासारखीच गोष्ट आहे. शस्त्र हातात आल्यानंतर माणूस ते स्वतःच्या संरक्षणासाठीच वापरेल असे काही नाही. शस्त्र हे धमकवण्यासाठी वापरले जाऊ शकते. शस्त्र हे दुसर्‍याला संपवण्यासाठी वापरले जाऊ शकते. शस्त्र हे प्रतिष्ठेसाठीही वापरले जाऊ शकते यात काही शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT