Why Smartphones Catch Fire | स्मार्टफोनला आग का लागते? 
विश्वसंचार

Why Smartphones Catch Fire | स्मार्टफोनला आग का लागते?

पुढारी वृत्तसेवा

स्मार्टफोनला आग लागण्यामागचे एक प्रमुख कारण लिथियम-आयन बॅटरीमध्ये होणारी ‘थर्मल रनअवे’ ही प्रक्रिया असू शकते. नेमकी ही प्रक्रिया काय आहे, फोनमध्ये याची सुरुवात कशी होते आणि कोणत्या कारणांमुळे स्मार्टफोन आग पकडू शकतो? चला समजून घेऊया.

थर्मल रनअवे म्हणजे काय?

आयफोन असो किंवा अँड्रॉईड कोणत्याही स्मार्टफोनला आग लागण्यामागचे किंवा तो फुटण्यामागचे मुख्य कारण ‘थर्मल रनअवे’ मानले जाते. ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. जेव्हा फोनच्या आत बसवलेली लिथियम-आयन बॅटरी अतिशय गरम होते किंवा तिच्यामध्ये अचानक अंतर्गत शॉर्ट सर्किट होते, तेव्हा ही घटना घडते. प्रत्येक बॅटरीचे एक निश्चित तापमान असते. जेव्हा हे तापमान ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा बॅटरीमध्ये असलेल्या रसायनांमध्ये अनियंत्रित अशी साखळी प्रतिक्रिया (Chain-Reaction) सुरू होते, जी पुढे धूर, स्फोट आणि भीषण आगीचे रूप धारण करते.

कोणत्या कारणांमुळे स्मार्टफोनला आग लागू शकते?

हातात असलेल्या अँड्रॉईड किंवा आयफोनमध्ये ओव्हरहीटिंग (अतिउष्णता) आणि आग लागण्याची अनेक कारणे असतात, त्यापैकी पाच प्रमुख कारणांचा खाली उल्लेख केला आहे...

निकृष्ट चार्जरचा वापर :

प्रमाणित नसलेले (नॉन-सर्टिफाईड) किंवा निकृष्ट दर्जाचे चार्जर आणि केबल वापरणे हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. हे चार्जर व्होल्टेज योग्य प्रकारे नियंत्रित करू शकत नाहीत, ज्यामुळे फोन ओव्हरचार्ज होण्याचा आणि शॉर्ट सर्किटचा धोका कैक पटीने वाढतो.

बॅटरीचे नुकसान (डॅमेज) :

अनेकदा स्मार्टफोन हातातून खाली पडल्यामुळे, दाबल्या गेल्यामुळे किंवा त्यात कोणतीही टोकदार वस्तू घुसल्यामुळे बॅटरीच्या आतील पातळ सेपरेटर (separator) तुटतो. हा सेपरेटर तुटताच दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकांना भिडतात आणि तत्काळ शॉर्ट सर्किट होऊन आग लागते.

ओव्हरहीटिंग (अतिउष्णता) :

हे एक सामान्य कारण आहे, ज्याबद्दल बहुतांश लोकांना माहीत असते. असे असूनही अनेक जण रात्री फोन उशीखाली किंवा बेडवर ठेवून झोपतात किंवा तो दीर्घकाळ चार्जिंगला जोडलेलाच सोडून देतात. असे केल्यामुळे फोनमधील उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि त्याचे तापमान वेगाने वाढू शकते. बॅटरीचे तापमान सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास ही स्थिती वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकते.

चार्जिंग सुरू असताना काम :

फोन चार्जिंगला लावून उच्च-ग्राफिक्सचे (high-graphics) गेम खेळणे, 4K व्हिडीओ स्ट्रीम करणे किंवा तासन्‌तास रील पाहणे यामुळे फोनचा प्रोसेसर आणि बॅटरी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अतिशय गरम होतात, ज्यामुळे ओव्हरहीटिंगची शक्यता वाढते.

मॅन्युफॅक्चरिंग किंवा अंतर्गत दोष (डिफेक्ट) :

फार दुर्मीळ प्रकरणांमध्ये कंपनीच्या असेंबलीच्या वेळी किंवा बॅटरी तयार करताना राहिलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे अथवा स्पार्कमुळेसुद्धा मोबाईलला आग लागू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT