नवी दिल्ली : हिमालय असो वा अँडीज पर्वत, उंचावर राहणार्या लोकांमध्ये मधुमेहाचे (डायबेटिस) प्रमाण कमी का असते? हे रहस्य शास्त्रज्ञांनी आता उलगडले आहे. एका ताज्या संशोधनानुसार, कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणात आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी (रेड ब्लडसेल्स) रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
रक्तपेशींची कार्यपद्धती अनोखी असल्याचे या संशोधात समोर आले. जेव्हा आपण उंचावर असतो, तेव्हा तिथल्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते (याला वैद्यकीय भाषेत ‘हायपोक्सिया’ म्हणतात). या स्थितीचा सामना करण्यासाठी मानवी शरीर अनेक बदल करते. उंदरांवर केलेल्या अलीकडील प्रयोगातून असे दिसून आले आहे की, कमी ऑक्सिजनच्या वातावरणात लाल रक्तपेशी रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज (साखर) शोषून घेतात. साखरेचा इंधनाऐवजी मदतनीस म्हणून वापर होत केला जातो. सामान्यतः पेशी ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी किंवा इंधन म्हणून करतात. मात्र, उंचावरील वातावरणात लाल रक्तपेशी या साखरेचा वापर इंधन म्हणून न करता, तिचे रूपांतर एका विशिष्ट पदार्थामध्ये करतात. हा पदार्थ शरीरातील विविध उतींना (टिश्यूज) ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यास मदत करतो.
उंचावर राहणार्या लोकांच्या लाल रक्तपेशी रक्तातील अतिरिक्त साखर शोषून घेत असल्यामुळे, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर लेव्हल) नैसर्गिकरित्या नियंत्रित राहते. रक्तातील साखरेचे हे स्वयंचलित व्यवस्थापन मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते. या शोधामुळे भविष्यात मधुमेहावर उपचार करण्यासाठी नवीन पद्धती विकसित केल्या जाऊ शकतात, त्यामध्ये उंचावरील वातावरणासारखी परिस्थिती कृत्रिमरित्या निर्माण करून साखरेवर नियंत्रण मिळवता येईल. उंच डोंगराळ भागातील कमी ऑक्सिजन केवळ फुफ्फुसांसाठी आव्हानात्मक नसून, तो शरीरातील साखर संतुलित ठेवण्यासाठी एक वरदान ठरत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. उंच डोंगराळ भागातील या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मधुमेहाशी लढण्यासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे.