सर्वच पक्ष्यांना का उडता येत नाही? JUAN BARRETO
विश्वसंचार

सर्वच पक्ष्यांना का उडता येत नाही?

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः पक्ष्यांना उड्डाण हे अनेक बाबतीत उपयुक्त ठरते. विशेषतः, भक्षकांपासून बचाव करण्यासाठी आणि अन्न किंवा चांगल्या हवामानाच्या शोधात दूर प्रवास करण्यासाठी. मात्र, उडण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. पक्षी त्यांच्या वजनाच्या तुलनेत सस्तन जीवांच्या तुलनेत दररोज सुमारे 75% अधिक ऊर्जा खर्च करतात. सर्वच पक्ष्यांना उडण्याची गरज भासत नाही, यामागे हे कारण असते का? सर्वच पक्षी आकाशात झेप घेत नाहीत. सध्या सुमारे 60 प्रजाती, म्हणजेच सर्व पक्षीप्रजातींपैकी 1% पेक्षा कमी, उडण्यास असमर्थ आहेत. यात शहामृग, पेंग्विन आणि कीवी यांचा समावेश होतो. या सर्व प्रजातींचा उगम उडणार्‍या पक्ष्यांमधूनच झाला असला, तरी उत्क्रांतीच्या प्रवासात त्यांनी उडण्याची क्षमता गमावून जमिनीवर किंवा पाण्यातील जीवनशैली स्वीकारली.

‘जर उड्डाण आवश्यक नसेल, तर पक्षी ही ऊर्जा अन्य आवश्यक गोष्टींसाठी वापरून जास्त चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकतात आणि संप्रजन करू शकतात,’ असं केनयोन कॉलेज (ओहायो) येथील जीवशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक नॅटली राईट यांनी सांगितले. 2016 मध्ये PNAS या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, बेटांवर राहणार्‍या पक्ष्यांमध्ये उड्डाणाचा उपयोग फारसा राहत नाही. तिथे भक्षक कमी असतात आणि अन्नासाठी स्पर्धाही कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी पक्ष्यांमध्ये उडण्याऐवजी जमिनीवरच स्थायिक होण्याची प्रवृत्ती दिसते. ‘जर भक्षक नसेल, स्थलांतराची गरज नसेल आणि दूर अंतरावर प्रवासही नको असेल, तर उड्डाणाचे फायदे तुलनेत कमी होतात, आणि खर्च जास्त,’ असं राईट म्हणतात. अशा बदलांमुळे पक्ष्यांच्या शरीररचनेत मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यांच्या पंखांसाठी लागणारी छातीच्या स्नायूंची घनता कमी होते. छातीची हाडं (स्टर्नम) आणि त्यावरचा कील नावाचा भाग लहान होतो. पंखातील हाडं... ह्युमरस, अल्ना आणि कार्पोमेटाकार्पस, हे लहान आणि कमकुवत बनतात. त्याचवेळी पाय लांब आणि बळकट होतात. कारण, पक्ष्यांना आता जमिनीवर चालणे किंवा धावणे आवश्यक असते. काही पक्ष्यांनी उड्डाण सोडून जलतरणाची कला अवगत केली. उदाहरणार्थ, पेंग्विन. त्यांच्याकडे अजूनही उड्डाणासाठी लागणारे स्नायू आणि कील आहे; पण ते पाण्याखाली पोहण्यासाठी वापरले जातात. ‘पेंग्विन पाण्यात उडतात’, असं केपटाऊन विद्यापीठातील पक्षीशास्त्राचे प्राध्यापक पीटर रायन सांगतात. फ्लाईटलेस ऑक (Pinguinus impennis) देखील आपल्या पंखांचा उपयोग जलतरणासाठी करत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT