why mammals are not colorful | सस्तन प्राणी पक्ष्यांसारखे रंगीबेरंगी का नसतात? 
विश्वसंचार

why mammals are not colorful | सस्तन प्राणी पक्ष्यांसारखे रंगीबेरंगी का नसतात?

पुढारी वृत्तसेवा

ब्रसेल्स : निसर्गात आपण सरडे, मासे आणि पक्षी पाहतो, जे गडद गुलाबी, निळ्या किंवा जांभळ्या अशा विविध छटांमध्ये आढळतात. मात्र वाघ, सिंह, हत्ती किंवा पांडा यांसारख्या सस्तन प्राण्यांच्या बाबतीत असे का घडत नाही? सस्तन प्राणी प्रामुख्याने काळ्या, तपकिरी किंवा पांढर्‍या रंगाचेच का असतात? या प्रश्नाचे उत्तर बेल्जियममधील घेंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोधले आहे.

जीवशास्त्रज्ञ मॅथ्यू शॉकी यांच्या मते, प्राण्यांमध्ये रंग दोन प्रकारे तयार होतात : 1. पिगमेंटस् (रंगद्रव्ये) : जे त्वचेत असतात आणि प्रकाश शोषून रंग तयार करतात. 2. स्ट्रक्चरल कलरेशन : यामध्ये त्वचा किंवा पिसांवर अशा सूक्ष्म रचना असतात, ज्या प्रकाशाला वाकवून चमकणारे रंग (उदा. मोरपंख) तयार करतात. मजेशीर गोष्ट म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये कॅरोटीनॉईडस् किंवा पॉर्फिरिन सारख्या रंगद्रव्यांचा अभाव असतो. त्यांच्याकडे फक्त ‘मेलॅनिन’ नावाचे एकच रंगद्रव्य असते, ज्यामुळे केवळ काळा आणि तपकिरी रंग मिळतो. तसेच सस्तन प्राण्यांचे केस हे पक्ष्यांच्या पिसांइतके गुंतागुंतीचे नसल्यामुळे त्यावर रंग तयार करणार्‍या सूक्ष्म रचना बनू शकत नाहीत.

सस्तन प्राणी रंगहीन असण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. सुमारे 100 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर डायनासोर राज्य करत होते, तेव्हा सस्तन प्राणी त्यांचे भक्ष्य होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे प्राणी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडत असत. सायन्स जर्नलमध्ये 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, संशोधकांनी जुरासिक आणि क्रिटेशियस काळातील सस्तन प्राण्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास केला. त्यांना आढळले की, हे सर्व पूर्वज तपकिरी किंवा राखाडी रंगाचे होते. रात्रीच्या अंधारात वावरताना गडद रंग त्यांना शिकार्‍यांपासून वाचवण्यासाठी मदत करत असे.

कोणताही भडक रंग त्यांच्या जीवावर बेतला असता, म्हणूनच उत्क्रांतीमध्ये भडक रंगांची निवड झाली नाही. काही सस्तन प्राणी जसे की ‘मँड्रिल यांच्या अंगावर निळा किंवा लाल रंग दिसतो. पण तो त्यांच्या केसांवर नसून केवळ केस नसलेल्या त्वचेवर असतो. तसेच, ‘स्लॉथ’च्या अंगावर दिसणारा हिरवा रंग हा त्याच्या केसांवर वाढणार्‍या शेवाळामुळे असतो, नैसर्गिक रंगद्रव्यामुळे नाही. डायनासोर नष्ट झाल्यानंतर सस्तन प्राण्यांच्या 6,000 हून अधिक प्रजाती विकसित झाल्या. तरीही त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेला हा ‘रंगांचा वारसा’ आजही कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT