विश्वसंचार

अलास्कामधील नद्या का होत आहेत नारंगी?

Arun Patil

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनानुसार अलास्कातील नद्या व झरे आपले रंग बदलत आहेत. त्यांचे स्वच्छ पाणी सफेद व निळसर रंगापासून नारंगी रंगात बदलत आहे. याचे प्रमुख कारण पृथ्वीच्या पर्माफ्रॉस्टचे वितळणे हे आहे. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातून विषारी खनिजे बाहेर पडत आहेत. या शोधामुळे नॅशनल पार्क सर्व्हिस, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अ‍ॅट डेव्हिस आणि यू. एस. जियोलॉजिकल सर्व्हेच्या संशोधकांना चकित केले आहे. या संशोधकांनी अलास्काच्या ब्रूक्स रेंजच्या जलमार्गांमध्ये 75 ठिकाणी परीक्षणे केली आहेत.

जर्नल कम्युनिकेशन्स : 'अर्थ अँड एन्व्हरायमेंट'मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार, गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये या रेंजमधील नद्या आणि झरे आपला रंग बदलत आहेत. त्यांचे पाणी गढूळ आणि नारंगी झाले आहे. लोह, जस्त, तांबे, निकेल आणि शिसासारख्या खनिजांमुळे हे पाणी प्रदूषित होत आहे. काही नद्या व झरे आता पर्यावरणासाठीही धोकादायक बनत आहेत. याचे कारण म्हणजे पर्माफ्रॉस्ट वितळत असून, त्यामधून हजारो वर्षांपासून जमिनीत दबलेली खनिजे अशा पाण्यात मिसळत चालली आहेत. पर्माफ्रॉस्ट म्हणजे बर्फ, माती व खडक यांची दीर्घकाळापासून गोठलेली जमीन.

रशियाच्या सैबेरियापासून ते कॅनडापर्यंत अनेक ठिकाणचे असे पर्माफ्रॉस्ट सध्या जागतिक तापमानवाढीमुळे वितळत आहेत. याबाबत ब्रेट पोलिन यांनी संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आर्क्टिक वर्तुळातील मातीमध्ये नैसर्गिकपणेच कार्बनिक कार्बन, पोषकतत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामध्ये पाराही असतो. हे सर्व पर्माफ्रॉस्टमध्ये असतात. उच्च तापमानामुळे ही खनिजे पर्माफ्रॉस्ट वितळल्याने आजूबाजूच्या जलस्रोतांमध्ये मिसळतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, आर्क्टिक प्रदेश हा जगाच्या अन्य भागांपेक्षा चौपट अधिक वेगाने उष्ण होत आहे.

SCROLL FOR NEXT