नवी दिल्ली : सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. फोन कॉल्सपासून व्हिडीओ पाहण्यापर्यंत सर्व कामे मोबाईलद्वारे होत असतात; पण मोबाईलबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मोबाईल चार्जर आणि केबल्स बहुतेकवेळा काळ्या किंवा पांढर्या रंगातच का दिसतात, असा प्रश्न कधी तुम्हाला कोणी विचारला का? कंपन्या हे रंग निवडण्यामागे खूप विचार करतात. जेणेकरून उत्पादन स्वस्त, सुरक्षित आणि वापरायला सोयीचे राहते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
चार्जिंगच्या वेळी फोन आणि चार्जर थोडे गरम होतात. काळा रंग उष्णता चांगली शोषून घेतो आणि बाहेर सोडतो, तर पांढरा रंग सूर्यप्रकाश किंवा उष्णता परावर्तित करतो. या दोन्ही रंगांमुळे चार्जरची अतिउष्णता टाळली जाते आणि ओव्हरहीटिंगचा धोका कमी होतो. इतर रंग वापरल्यास उष्णता योग्यरीत्या नियंत्रित होण्यात अडचण येऊ शकते, म्हणून हे रंग विज्ञानाच्या द़ृष्टीने सर्वोत्तम मानले जातात. मोबाईल कंपन्या दरवर्षी लाखो-कोट्यवधी चार्जर बनवतात. काळा आणि पांढरा हे मूलभूत रंग असल्याने त्यासाठी विशेष रंगकाम किंवा रसायने वापरावी लागत नाहीत.
इतर रंगांसाठी मशिन वारंवार स्वच्छ करावी लागते किंवा अतिरिक्त डाई खरेदी करावी लागते, ज्यामुळे खर्च वाढतो. या साध्या रंगांमुळे उत्पादन प्रक्रिया जलद आणि स्वस्त होते, जे व्यवसायाच्या द़ृष्टीने फायदेशीर ठरते. चार्जर काळा किंवा पांढरा असल्याने तो कोणत्याही फोनच्या रंगाशी जुळवण्याची गरज नाही. जर चार्जर विविध रंगांत आले, तर एखादा खराब झाल्यास त्या नेमक्या रंगाचा शोध घ्यावा लागेल, ज्यामुळे गैरसोय होईल. हे तटस्थ रंग यूजर्सना सहज रिप्लेसमेंट मिळवता येते आणि रोजच्या वापरात कोणतीही अडचण येत नाही. चार्जर बाजारात येण्यापूर्वी आग लागण्याची, शॉर्टसर्किटची किंवा इतर जोखिमांच्या कठोर चाचण्या होतात. काळ्या किंवा पांढर्या रंगावर जळण्याचे डाग, वितळणे किंवा धुराचे निशाण लगेच दिसतात. ज्यामुळे चाचणी सोपी आणि अचूक होते. इतर रंगांत हे निशाण लपून राहू शकतात. शिवाय, या रंगांच्या प्लास्टिकची रचना आधीच प्रमाणित असते म्हणून सुरक्षा मानके लवकर मंजूर होतात.