लंडन : जगातील सर्वात पहिलं एटीएम हे स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरनने बनवलं होतं. २७ जून १९६७ मध्ये लंडनच्या एनफील्ड भागात बार्कलेज बँकेच्या एका शाखेत आभार हे एटीएम मशिन लावण्यात आलं होतं. असं सांगितलं जातं की, शेफर्ड बॅरनला ही आयडिया चॉकलेट विकणाऱ्या एका वेंडिंग मशिनला पाहून आली होती. एके दिवशी बँक बंद असल्यामुळे पैसे काढता न आल्याने शेफर्ड बॅरनला असा विचार सुचला की, ज्याप्रमाणे एखादे यंत्र चॉकलेट बाहेर देते, त्याचप्रमाणे यंत्राद्वारे पैसेही काढता येऊ शकतात. आपल्या सारख्या असंख्य ग्राहकांची गरज ओळखून शेफर्ड बॅरन यांनी हे यंत्र तयार केले. तेव्हा त्यांना अशा एका प्रणालीची गरज होती जी पैसे काढणारी व्यक्ती हीच खरा ग्राहक आहे याची खात्री करू शकेल. हे साध्य करण्यासाठी त्यांना ‘पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर’ (PIN) ची कल्पना सुचली.
शेफर्ड बॅरन यांनी स्वतः सैन्यदलात काम केले होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला आपला सैन्यातील ६ अंकांचा क्रमांक पिन म्हणून ठेवण्याचा विचार केला होता. जेणेकरून सुरक्षा मजबूत होईल आणि त्यांना असे वाटले की, जितके जास्त अंक असतील तितका तो पिन अधिक सुरक्षित असेल आणि कोणीही तो सहजपणे तोडू शकणार नाही.
शेफर्ड बॅरनने आधी त्याची पत्नी कॅरोलिनला हा ६ अंकी एटीएम पिन आठवण करून देण्याची तयारी केली. तेव्हा त्यांना एक समस्या आली. ६ अंकीपेक्षा चार अंकी पिन लगेचच लक्षात राहतो. मात्र त्याहून जास्त अंकांचा क्रमांक हा आठवणीत ठेवण्यात सुद्धा अवघड होतो. पत्नीचे म्हणणे गांभीर्याने घेऊन शेफर्ड बॅरन यांनी आपली संपूर्ण योजना बदलली आणि पिन ६ अंकी ठेवण्याऐवजी ४ अंकी केला.
चार अंकांचा पिन लक्षात ठेवणं हे खूप सोपं आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने बघायचं झाल्यास तर चार अंकांचा पिन हा सुरक्षित मानला जात नाही. चार अंकांच्या पिनमध्ये केवळ दहा हजार कॉम्बिनेशन शक्य असतात. म्हणजेच 0000 ते ९९९९ पर्यंत. जर हाच पिन ६ अंकांचा असता तर ही संख्या लाखांमध्ये पोहोचली असती. हा पिन क्रॅक करणं अजूनच अवघड होतं.