Why animals shake head | प्राणी आपले डोके का झटकतात? 
विश्वसंचार

Why animals shake head | प्राणी आपले डोके का झटकतात?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : मांजर किंवा कुत्रा पाळणाऱ्यांना त्यांच्या एका सवयीचे विशेष कुतूहल असते, ते म्हणजे अचानक वेगाने डोके झटकणे. जेवल्यानंतर, पाणी प्यायल्यानंतर किंवा प्रेमाने खाजवून झाल्यानंतर पाळीव प्राणी आपले डोके विशिष्ट पद्धतीने हलवतात. पण ते असे का करतात? त्यांच्या आरोग्याबाबत काही समस्या तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिली आहेत.

तज्ज्ञांच्या मते, मांजरींच्या डोक्यावरील आणि कानांच्या आसपासचे मज्जातंतू अत्यंत संवेदनशील असतात. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरच्या ‌‘अँथोझूलॉजिस्ट‌’ सराह क्राउली यांच्या मते, जेव्हा हे संवेदनशील भाग उद्दीपित होतात, तेव्हा मांजरी डोके झटकतात. जर तुम्ही मांजरीच्या कानाजवळ किंवा मिशांजवळ स्पर्श केला, तर त्या प्रतिसादाच्या स्वरूपात डोके झटकू शकतात. खाताना किंवा पिताना मिशांवर किंवा कानात काही अडकले असेल, तर ते झटकून टाकण्यासाठी ही हालचाल अत्यंत प्रभावी ठरते. जर कोणी मांजरीच्या कानावर फुंकर मारली, तर रागाच्या भरात किंवा अस्वस्थतेमुळे त्या असे करतात.

मांजरींना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. कुत्र्यांच्या बाबतीत डोके झटकण्याची कारणे मांजरींपेक्षा थोडी वेगळी असू शकतात. जर्मन शेफर्डसारख्या ज्या कुत्र्यांचे कान ताठ असतात, त्यांच्या कानात कचरा किंवा कीटक जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते वारंवार डोके झटकतात. याउलट लोब्या कानांच्या कुर्त्यांमध्ये हे प्रमाण कमी दिसते. खेळताना खेळण्याला तोंडात धरून वेगाने डोके हलवणे, हा त्यांच्या शिकार करण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा भाग असतो. अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कुत्रे डोक्यापासून शेपटीपर्यंत पूर्ण शरीर झटकतात. याला ‌‘वेट डॉग शेक‌’ असेही म्हणतात. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमधील तज्ज्ञ ॲमी मिले यांच्या मते, शरीर झटकणे हे केवळ स्वच्छतेसाठी नसून ते ‌‘इमोशनल रिसेट‌’ करण्याचे माध्यम आहे.

‌‘एखाद्या तणावपूर्ण घटनेनंतर किंवा खूप उत्साहात खेळून झाल्यानंतर, कुत्रे स्वतःला शांत करण्यासाठी आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी शरीर झटकतात. हे त्यांच्यासाठी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याचे लक्षण आहे.‌ ‘वेगाने डोके झटकल्यामुळे प्राण्यांना चक्कर येत नाही. तज्ज्ञांच्या मते, गोल-गोल फिरण्याने चक्कर येण्याची शक्यता जास्त असते; मात्र डोके झटकणे ही एक नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे जी उंदीर, ससे आणि इतर सस्तन प्राण्यांमध्येही दिसून येते. त्यामुळे, जर तुमचे पाळीव प्राणी अधूनमधून असे करत असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. तो त्यांच्या संवादाचा आणि स्वच्छतेचा एक नैसर्गिक भाग आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT