नवी दिल्ली : चहाचेही अनेक प्रकार असतात व त्यापैकी ग्रीन टी वगैरेसारखे प्रकार अनेक लोकांना आरोग्यासाठी आकर्षित करीत असतात. काहीजण दुधाच्या चहापेक्षा लेमन टी पिणे पसंत करतात. कारण लेमन टी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानला जातो. विशेषतः जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लिंबाचा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर करू शकता. कारण लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंटस् आणि व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. कोणत्याही ॠतुत तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी, तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पिऊ शकता. असे केल्याने तुम्ही दिवसभर सक्रिय राहू शकता. त्याचबरोबर लेमन टी प्यायल्याने काही लोकांना शारीरिक नुकसानदेखील होऊ शकते. लेमन टी कोणत्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते, त्याबाबत तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती...
ज्या लोकांना आंबट पदार्थांचे सेवन केल्याने अॅलर्जीची समस्या उद्भवते त्या लोकांनी लेमन टी अजिबात पिऊ नये. तुम्ही जर लेमन टीमध्ये मध किंवा इतर गोष्टी मिक्स करत असाल तर त्यामुळे गंभीर अॅलर्जी होऊ शकते. हे प्यायल्याने शरीरावर खाज सुटणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या सर्वांव्यतिरिक्त, तोंड आणि घशात सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे, त्यांनीही लेमन टी पिऊ नये. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स या आजारामध्ये, लेमन टी प्यायल्याने तुमच्या पोटातील आम्ल वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत लेमन टी पिणे नक्कीच टाळा. लेमन टीमध्ये टायरामाईन हे अमिनो आम्ल असते. ज्यामुळे मायग्रेनच्या रुग्णाला समस्या निर्माण होऊ शकतात. मायग्रेनच्या रुग्णांनी लेमन टी पिल्यास मायग्रेनचा झटका येऊ शकतो. ज्यामुळे तीव्र डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण खूप जास्त असते. कारण यात सायट्रिकचे प्रमाण आहे, म्हणून जर तुम्ही ते जास्त वापरले तर तुमच्या दातांच्या मुलामा गंभीर नुकसान होईल. त्यासोबतच दातांच्या पोकळीची समस्या उद्भवू शकते. याशिवाय दातांमध्ये आंबटपणा आणि वेदनांच्या समस्येचा त्रास होईल. जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर लेमन टी पिऊ नका. जर तुम्ही उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मायग्रेन यासारख्या कोणत्याही आजारासाठी नियमित औषध घेत असाल तर तुम्ही लेमन टी पिऊ नये. कारण त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.