नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकतेच क्षयरोग (टीबी) आणि कुपोषण (अंडरन्यूट्रीयशियन) यासंबंधीच्या आपल्या एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (कोन्सोलिटेड गाईडलाइन्स) मोठे बदल केले आहेत. या धोरणात्मक बदलाला मंगळूर येथील डॉक्टर दाम्पत्य, डॉ. उमेश मोहन सी. एस. आणि डॉ. शिल्पा आरळीकर यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाचा आधार घेतला आहे. त्यांच्या कार्यामुळे जागतिक टीबी धोरणावर थेट परिणाम झाला आहे.
8 ऑक्टोबर रोजी, डब्ल्यूएचओने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यात टीबीच्या काळजीमध्ये पोषणाच्या भूमिकेवर जोर देण्यात आला आहे. उपचारांमध्ये केवळ औषधोपचारांवर लक्ष केंद्रित न करता, आता पोषण हा उपचाराचा एक मुख्य घटक (कोअर कॉपोनंट) मानला गेला आहे. ज्या ठिकहाणी अन्न असुरक्षितता (फूड इनसिक्युरिटी) मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी टीबी रुग्णांच्या घरातील संपर्कात असलेल्या व्यक्तींंना अन्न सहाय्य (फूड अॅसिस्टन्स) पुरवण्याची शिफारस करण्यात आली आहे. टीबी झालेल्या रुग्णाची आणि त्यांच्या कुटुंबाची पोषण स्थिती (न्यूट्रिशिनल स्टेटस) याच्याशी उपचाराचे परिणाम जोडले गेलेले असतात. या गोष्टींवर भर देत ‘घर-केंद्रित’ द़ृष्टिकोन स्वीकारला गेला आहे. या उपायांमुळे टीबीचा प्रादुर्भाव कमी करणे आणि जगभरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ़(रिकव्हरी रेट) सुधारणे, हे डब्ल्यूएचओचे उद्दिष्ट आहे.
डब्ल्यूएचओच्या क्षयरोग विभागाच्या संचालक डॉ. तेरेझा कासेएवा म्हणतात, टीबीचा अंत करण्यासाठी, आम्हाला कुपोषण आणि अन्न असुरक्षिततेकडे एका व्यापक, घर-केंद्रित प्रतिसादाचा भाग म्हणून लक्ष देणे आवश्यक आहे.
व्यापक टीबी काळजीमध्ये पोषणाचे एकत्रीकरण हे रोग आणि गरिबीचे चक्र तोडण्यासाठी आवश्यक आहे आणि टीबीमुक्त जगाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डब्ल्यूएचओच्या या अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांनी सार्वजनिक आरोग्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, कारण यातून कुपोषण आणि टीबी यांच्यातील गंभीर संबंधाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
डॉ. उमेश मोहन सी. एस. आणि डॉ. शिल्पा आरळीकर यांनी टीबीचा जास्त भार असलेल्या भारतातील भागांमध्ये संशोधन केले. या संशोधनात त्यांनी टीबीच्या वाढीत कुपोषण प्रमुख जोखीम घटक असल्याचे सिद्ध केले. कुपोषित व्यक्ती केवळ टीबीसाठी अधिक संवेदनशील नसतात, तर कुपोषणावर लक्ष दिले नाही तर त्यांच्या उपचारानंतर बरे होण्यासही विलंब होतो, असा निष्कर्ष या या डॉक्टर दाम्पत्याने काढला आहे. त्यांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले की टीबी रुग्णांना पोषण आधार पुरवल्याने उपचारांचे पालन आणि परिणाम लक्षणीयरीत्या सुधारतात. यामुळेच, वैद्यकीय उपचारांसोबत पोषण हस्तक्षेप एकत्र करण्याची तातडीची गरज टीबी काळजी प्रोटोकॉलमध्ये निर्माण झाली आहे.