Supernova Explosion | मृतप्राय तार्‍याला फाडून सुपरनोव्हाचा स्फोट 
विश्वसंचार

Supernova Explosion | मृतप्राय तार्‍याला फाडून सुपरनोव्हाचा स्फोट

वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच कैद केला अद्भुत क्षण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या (ईएसओ) वैज्ञानिकांनी एका मोठ्या तार्‍याचा स्फोट होऊन सुपरनोव्हा तयार होत असतानाचा अत्यंत सुरुवातीचा क्षण आणि त्याच्या शॉक फ्रंटचा आकार निश्चित केला आहे. प्रथमच मिळालेल्या या निरीक्षणाने तार्‍यांच्या मृत्यूच्या आणि उत्क्रांतीच्या (स्टेलर इव्हॅल्युशन) सुरुवातीच्या टप्प्याविषयीचे अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. एप्रिल 2024 मध्ये ‘एसएन 2024 जीजीआय’ नावाच्या सुपरनोव्हाचा स्फोट सुमारे 2 कोटी 36 लाख प्रकाशवर्षे दूर ‘एनजीसी 3621’ आकाशगंगेत झाला. हा स्फोट अतिशय लवकर पाहण्यात आला आणि व्हेरी लार्ज टेलिस्कोप (व्हीएलटी) वापरून त्याचे निरीक्षण करण्यात आले.

क्षणभंगुर टप्पा :

हा निरीक्षणाचा टप्पा स्फोटाच्या 26 तासांनंतर सुरू झाला. स्फोटानंतर काही तासांतच त्याची चमक मंदावते. त्यामुळे वेळेवर आणि वेगवान प्रतिसादामुळेच हे यश मिळाले. शॉक-ब्रेकआउटरूपाने तो टप्पा असतो, जेव्हा स्फोटाची शॉकवेव्ह तार्‍याच्या पृष्ठभागातून बाहेर पडते. या निरीक्षणात स्फोटाच्या शॉकवेव्हचा आकार गोलाकार नव्हता, तर ऑलिव्ह फळासारखा होता आणि तो एका विशिष्ट अक्षावर पसरलेला होता.

स्फोटाचा आकार का महत्त्वाचा?

खगोलशास्त्रज्ञ यी यांग यांच्या मते, सुपरनोव्हा स्फोटाची भूमिती (जीओमेटरी) तार्‍यांची उत्क्रांती आणि या ब्रह्मांडीय फटाक्यांमागील भौतिक प्रक्रियांची (फिजिकल प्रोसेस) मूलभूत माहिती देते. स्पेक्ट्रोपोलॅरिमेट्री नावाचे विशेष तंत्रज्ञान वापरून हा आकार निश्चित करण्यात आला, ज्यामुळे प्रकाशाच्या ध्रुवीकरणाचे मापन करता आले आणि सूक्ष्म कोनीय स्तरावर स्फोटाच्या आकाराविषयी माहिती मिळाली.

तार्‍याच्या मृत्यूची प्रक्रिया

मोठा तारा त्याच्या गाभ्यातील (कोअर) फ्युजन इंधन (फ्युजन फ्युअल) संपल्यावर मरतो. लोह तयार झाल्यावर फ्युजनची प्रक्रिया थांबते. बाहेरील दाब नसल्यामुळे तार्‍याचा गाभा आतल्या बाजूला कोसळतो, ज्यामुळे शॉकवेव्ह तयार होते. ही शॉकवेव्ह गाभ्याकडून उसळी (रिबाऊंड) घेऊन तार्‍याच्या पृष्ठभागाला फाडून बाहेर पडते.

आकाराच्या बदलाचे रहस्य

सुपरनोव्हाचा हा ऑलिव्हसारखा आकार नंतर बाहेर पडणार्‍या हायड्रोजन-समृद्ध पदार्थांमध्येही कायम राहिला, याचा अर्थ हा आकार रँडमली अर्थात याद़ृच्छिक आलेला नाही, तर एका मोठ्या यंत्रणेतून आला आहे. स्फोटाचा अक्ष (अ‍ॅक्सिस) आणि आसपासच्या सामग्रीचा अक्ष (अ‍ॅक्सिस ऑफ सराऊंडिंग मटेरियल) यात बदल दिसून आला. यामागे त्या तार्‍याला जोडीदार तारा (बायनेरी कंपेनियन) असण्याची शक्यता आहे, ज्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तार्‍याच्या मृत्यूच्या वेळी हा आकार तयार झाला असावा, असे शास्त्रज्ञ मानतात. हा शोध 2 कोटी 36 लाख प्रकाशवर्षे दुरून मिळालेला असून, खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक मोठी वैज्ञानिक उपलब्धी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT