श्रीनगर : आपला भारत विविधतेने भरलेला देश आहे. येथील लोक आपली संस्कृती, परंपरा आणि अन्नपदार्थांच्या वैविध्याने जगाला चकित करतात. कोणी शुद्ध शाकाहारी तर कोणी मांसाहारी; परंतु प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात एक गोष्ट जवळपास समान असते, ती म्हणजे कांदा आणि लसूण. डाळीला फोडणी द्यायची असो किंवा भाजीची चव वाढवायची असो, कांद्याशिवाय स्वयंपाक अपूर्ण वाटतो; पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक असे शहर आहे जिथे कांद्यावर पूर्णपणे बंदी आहे? होय, जम्मू-काश्मीरमधील कटरा शहर, जे माता वैष्णो देवीच्या यात्रेचे प्रारंभिक ठिकाण आहे, तिथे कांदा आणि लसणाचे नावही घेतले जात नाही.
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात स्थित कटरा शहर धार्मिक द़ृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. इथूनच माता वैष्णो देवीच्या यात्रेची सुरुवात होते. दरवर्षी लाखो भाविक या शहरात दर्शनासाठी पोहोचतात. येथील धार्मिक वातावरणाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने कांदा आणि लसणाचा वापर, लागवड आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. कटरा शहराची खास गोष्ट म्हणजे, येथील कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर कांदा-लसूण नसलेले पदार्थ (सात्त्विक भोजन) मिळतात. किराणा दुकानांवर कांदा विकला जात नाही किंवा भाजी मार्केटमध्येही त्याची झलक दिसत नाही. असे असूनही येथील भोजन अत्यंत चविष्ट असते.
भाविकांना सात्त्विक आणि पौष्टिक अन्न दिले जाते, जे चव आणि श्रद्धा या दोन्हीत समतोल राखते. या परंपरेला जिवंत ठेवण्यात स्थानिक लोकांचे मोठे योगदान आहे. प्रशासनासोबतच रहिवासी देखील कांदा-लसणापासून दूर राहणे ही आपली धार्मिक जबाबदारी मानतात. अनेक दुकानदार सांगतात की, बाहेरून येणारे पर्यटक अनेकदा कांद्याची मागणी करतात; परंतु ते त्यांना नम्रपणे नकार देतात आणि सात्त्विक पर्याय सुचवतात. कांद्यासारख्या रोजच्या वापरातील पदार्थाला आपल्या श्रद्धेमुळे त्यागून पूर्णपणे बंदी घालणारे कटरा हे भारतातील एकमेव शहर आहे. हा केवळ धार्मिक निर्णय नाही, तर शिस्त आणि सामूहिक आस्थेचे उदाहरण आहे. येथील लोकांचा विश्वास आहे की माता वैष्णो देवीच्या नगरीत सात्त्विकता टिकवून ठेवणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे. कटरा हे आज केवळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र नसून, आस्था-आधारित परंपरा समाजात कशा प्रकारे समाविष्ट होऊ शकतात, हे दाखवते.