वॉशिंग्टन : गेल्या अनेक दशकांपासून मानवी मेंदूच्या विकासाची कथा ही मुख्यत्वे मांसाहाराभोवती फिरताना दिसली आहे. सुमारे ४० लाख वर्षांत मानवी मेंदूच्या जलद आणि अफाट विकासासाठी मांसातून मिळणारे प्रथिने आणि चरबी हेच सर्वात महत्त्वाचे मानले जात होते. मात्र, एका नव्या संशोधनाने या जुन्या धारणेला थेट आव्हान दिले आहे. मानवी मेंदूच्या विकासात केवळ मांसच नाही, तर शर्करा आणि कार्बोहायड्रेटस् यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा होता, असा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.
‘सायन्स’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत ‘मानवी विकासात आहारातील शर्करेची महत्त्वपूर्ण भूमिका’ या शीर्षकाखाली हे नवीन संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांनी मानवाच्या पूर्वजांच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील पोषक घटकांच्या गरजांचा एक विशेष मॉडेल तयार केला. यामध्ये त्यांना आढळले की, मेंदूच्या विकासाला गती देण्यासाठी प्राण्यांपासून मिळणाऱ्या अन्नाइतकीच आहारातील शर्करेची भूमिका अत्यंत मोलाची होती. अहवालानुसार, फळे आणि मधातून मिळणारे ‘ग्लुकोज’, तसेच नंतरच्या काळात शिजवलेल्या स्टार्चयुक्त अन्नातून मिळणारे ग्लुकोज मेंदूची प्रचंड ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आवश्यक होते. यामुळे मानवी आहाराच्या उत्क्रांतीचा केंद्रबिंदू आता केवळ प्रथिनांवर मर्यादित न राहता कार्बोहायड्रेटस्वरही आला आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या एकूण वजनाच्या तुलनेत मेंदूचे वजन केवळ २ टक्के असते. परंतु, तो शरीराच्या एकूण चयापचय ऊर्जेपैकी २० टक्के ऊर्जा एकटाच वापरतो.
पाच वर्षांच्या लहान मुलांच्या बाबतीत ही ऊर्जेची गरज तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचते! यावरून हे स्पष्ट होते की, मानवी मेंदू मुख्यत्वे ‘ग्लुकोज’ वर चालतो. संशोधकांच्या मते, मेंदूच्या अविरत वाढीसाठी ग्लुकोजचा सततचा पुरवठा आवश्यक होता, जो केवळ मांसाहारातून मिळणे शक्य नव्हते, विशेषतः माणसाने आगीचा शोध लावण्यापूर्वीच्या काळात. संशोधकांनी मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहारातील कार्बोहायड्रेटस्ची उपलब्धता आणि मेंदूची ग्लुकोजची मागणी यांची तुलना करणारे एक मॉडेल तयार केले. हे मॉडेल वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या अन्नाच्या प्रमाणावर आधारित सहा टप्प्यांत काम करते.
यात चिंपांझींसारख्या सुरुवातीच्या आहारापासून ते आधुनिक शिकारी-संग्राहक गटांच्या आहारापर्यंतचा अभ्यास करण्यात आला. यासाठी जीवाश्म आयसोटोप गुणोत्तर, दातांची रचना आणि अनुवांशिक डेटा यांचा वापर करण्यात आला. हा अभ्यास प्राण्यांच्या मांसाचे महत्त्व पूर्णपणे नाकारत नाही. परंतु, तो कार्बोहायड्रेटस्नाही तितकेच समान महत्त्व देतो. जेव्हा आपण आहाराने मानवी उत्क्रांती आणि शरीराची रचना कशी घडवली याचा अभ्यास करतो, तेव्हा शर्करा आणि स्टार्चकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे या अभ्यासाने सिद्ध केले आहे.