नवी दिल्ली : होळी झाल्यानंतर सर्वत्रच उकाडा वाढत चालला आहे. उन्हाळा सुरू झाला की, घामामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी आपण काय खातो आणि पितो यासोबतच आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो, यालाही मोठे महत्त्व असते. विज्ञानानुसार, काही विशिष्ट रंग उष्णता शोषून घेतात. तर काही रंग ते परावर्तित करतात. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी कपड्यांच्या रंगांची निवड कशी असावी, याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
उन्हाळ्यात पांढरा रंग हा सर्वात थंड मानला जातो. पांढरा रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता शोषून घेण्याऐवजी ती परावर्तित करतो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच, जास्त घाम येत नाही. गडद रंगांच्या तुलनेत फिकट गुलाबी रंग डोळ्यांना शांतता देतो. त्यासोबतच शरीरालाही गारवा देतो. हा रंग उष्णता कमी शोषून घेत असल्याने उन्हाळ्यात बाहेर पडताना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. निळा रंग हा अनसर्गतः शीतलतेचे प्रतीक मानला जातो. उन्हाळ्यात गडद निळ्याऐवजी ‘स्काय ब्ल्यू’ किंवा ‘पावडर ब्ल्यू’ रंगांचे सुती कपडे घातल्यास उन्हाचा चटका कमी जाणवतो. पिवळा हा ऊर्जेचा रंग असला, तरी उन्हाळ्यात त्याचे फिकट शेडस् अत्यंत प्रभावी ठरतात.
पिवळा रंग प्रकाशाला परावर्तित करतो, ज्यामुळे शरीराला उष्णतेपासून संरक्षण मिळते. मिंट ग्रीन किंवा फिकट हिरवा हा निसर्गाच्या जवळ जाणारा रंग उन्हाळ्यात मनाला आणि शरीराला प्रसन्न ठेवतो. मिंट ग्रीन रंगाचे कपडे घातल्याने उष्णतेचा दाह कमी जाणवतो. उन्हाळ्यात काळा, गडद निळा किंवा गडद जांभळा रंग टाळावा. हे रंग उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे अधिक घाम येतो आणि अस्वस्थता वाढते. केवळ रंगच नाही, तर कापडही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात सुती किंवा लिनेन कापडाचेच कपडे वापरावेत. कारण, ते घाम शोषून घेतात आणि त्वचेला हवा खेळती ठेवतात. उन्हाळ्यात घट्ट कपड्यांऐवजी थोडे सैल कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे.