विश्वसंचार

पहिला ट्रॅफिक सिग्नल कुठे होता?

Arun Patil

लंडन : सध्याच्या काळात आपल्या सवयीच्या झालेल्या अनेक गोष्टींचे मूळ कुठे आहे, याचा शोध घेणे अनेकांना रंजक वाटत असते. रस्ते वाहतूक म्हटलं की, डोळ्यांसमोर ट्रॅफिक सिग्नलही उभे राहतात. जगातील पहिले ट्रॅफिक सिग्नल कुठे उभे करण्यात आले होते, याची तुम्हाला माहिती आहे का? डिसेंबर 1868 मध्ये ब्रिटनची राजधानी लंडनच्या वेस्टमिंस्टरमध्ये असे पहिले ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले होते. हे सिग्नल ब्रिटनची संसद आणि वेस्टमिंस्टर ब्रिजदरम्यान लावले होते. ते विजेचे नव्हते, तर चक्क गॅसबत्तीचे होते. शिवाय, त्यांचा उद्देश रस्त्यांसाठी नव्हता, तर रेल्वेमार्ग पद्धत स्वीकारण्यासाठीचा होता!

गॅसच्या साहाय्याने हे दिवे लावले जात असल्याने ते मानवाकडूनच लावले जात असत. एक पोलिस कर्मचारी पाईपमधून त्यामध्ये गॅस भरत असे. एकदा गॅस लीकेजमुळे स्फोट होऊन एका पोलिस कर्मचार्‍याचा वेदनादायक मृत्यूही झाला होता. हे ट्रॅफिक सिग्नल म्हणजे एक खांबासारखा पाईप असे, ज्यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या बत्ती असत. हे सिग्नल ब्रिटिश रेल्वे ट्रॅफिक इंजिनिअर जॉन पीक नाईट यांनी बनवले होते. आधुनिक ट्रॅफिक लाईटस्चा विचार केला, तर त्याची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली होती.

सन 1914 मध्ये क्लीव्हलँड येथे असा ट्रॅफिक सिग्नल सर्वप्रथम बसवण्यात आला होता. तो विजेवरच चालत असला, तरी त्याचा विकासही अनेक टप्प्यांमध्ये झाला. हे लाईटस् आधी स्विचने सुरू व बंद केले जात असत. कालौघात त्यामध्ये बदल झाले. मिशिगनमधील पोलिस अधिकारी विल्यम यांनी त्याचा शोध लावला होता. 1921 मध्ये विल्यम यांनीच लाल व हिरव्या रंगाबरोबर पिवळा रंगही यामध्ये आणला. हा रंग आजही सिग्नल बदलत असल्याचा संकेत देतो. भारतात पहिला ट्रॅफिक सिग्नल चेन्नईमध्ये 1953 साली बसवण्यात आला. त्यावेळी एग्मोर जंक्शनवर हे सिग्नल लावण्यात आले होते. काही काळाने बंगळूरमध्ये व हळूहळू अन्य अनेक शहरांमध्ये असे सिग्नल्स लावण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT