नवी दिल्ली : एकेकाळी आपल्याला कमळासारखी रचना असलेले, लाल रंगाचे ड्रॅगन फ्रूट बघूनही माहिती नव्हते. आता मात्र ते बाजारात आणि घराघरांत रुळले आहे. दिसायला अत्यंत आकर्षक आणि विदेशी वाटणारे हे फळ केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानले जाते. या सुपरफूडची उत्पत्ती नेमकी कुठली आहे आणि त्याचे शरीरासाठी काय उपयोग आहेत, याबद्दल जाणून घेऊया...
ड्रॅगन फ्रूट हे मूळचे चीनमधील नव्हे तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय वनांमधील मानले जाते. हे फळ ‘हिलोसेरियस’ (Hylocereus) प्रजातीमधील एका प्रकारच्या कॅक्टसच्या वेलीवर उगवते. प्राचीन काळी हे फळ ‘पिटाया’ किंवा ‘स्ट्रॉबेरी पिअर’ या नावांनी ओळखले जायचे. नंतरच्या काळात स्पॅनिश आणि पोर्तुगीज व्यापारी हे फळ आशियाई देशांमध्ये घेऊन आले. विशेषतः व्हिएतनाम, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि चीन या देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणावर शेती सुरू झाली. सध्या भारतामध्येही महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती यशस्वीपणे केली जात आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटिऑक्सिडंटस् आणि लोह मुबलक प्रमाणात असते. दैनंदिन आहाराचा हा एक उत्तम भाग बनू शकतो.
यात असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते. या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठता दूर करून पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम आहार मानला जातो. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आणि त्वचेला नैसर्गिक तेज देण्यासाठी हे फळ अत्यंत गुणकारी आहे. या फळाच्या काळ्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.