नवी दिल्ली : आजकाल प्रत्येकाला फोटो काढण्याचा, सेल्फी घेण्याचा छंद असतो; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतात पहिला कॅमेरा कधी आला? हा काही साधा प्रश्न नाही, तर ही एक अशी रंजक कहाणी आहे, जी आपल्याला तब्बल 180 वर्षे मागे घेऊन जाते. चला तर मग जाणून घेऊया, छायाचित्रण काढण्याचे हे तंत्रज्ञान भारतात कसे पोहोचले, ते कोणी आणले आणि सामान्य लोकांपर्यंत ते कसे पोहोचले....
कॅमेर्याचा शोध फ्रान्समध्ये लागला. 1826 मध्ये जोसेफ नीप्स यांनी जगातील पहिला फोटो काढला; पण त्यासाठी तब्बल 8 तास लागले होते. त्यानंतर 1839 मध्ये लुई डागेर यांनी एक सुधारित कॅमेरा बनवला, जो काही मिनिटांतच छायाचित्रे काढू शकत होता. हेच ते तंत्रज्ञान होते, जे पुढे भारतात पोहोचले. भारतात कॅमेरा 1840 च्या दशकात पोहोचला, जेव्हा भारतावर बि-टिशांचे राज्य होते. त्यावेळी ही एक अत्यंत महागडी आणि दुर्मीळ वस्तू होती, जी फक्त बि-टिश अधिकारी आणि श्रीमंत लोकच खरेदी करू शकत होते.
सुरुवातीचे कॅमेरे ‘डागेरोटाईप’ (Daguerreotype) तंत्रज्ञानाचे होते, ज्यात धातूच्या प्लेटवर छायाचित्रे उमटवली जात असत. एका अहवालानुसार, भारतातील पहिले छायाचित्र डॉ. जॉन मॅकॉश यांनी काढले होते. ते ईस्ट इंडिया कंपनीत कार्यरत होते आणि त्यांनी कलकत्ता (आताचे कोलकाता) आणि दक्षिण भारतातील काही ऐतिहासिक छायाचित्रे टिपली होती, तर ‘बि-टिश जर्नल ऑफ फोटोग्राफी’नुसार, भारतातील पहिले छायाचित्र एका शीख सरदाराचे होते, जे डॉ. जॉन मॅकॉश यांनीच काढले होते. सुरुवातीला छायाचित्रण केवळ बि-टिशांपुरतेच मर्यादित होते. परंतु, काही भारतीयांनीही हे कौशल्य आत्मसात केले.
यामध्ये सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे, राजा दीनदयाळ यांचे, जे 19 व्या शतकातील महान भारतीय छायाचित्रकारांपैकी एक होते. त्यांनी केवळ बि-टिश अधिकार्यांचेच नव्हे, तर भारतीय राजे आणि सामान्य लोकजीवनाची ही छायाचित्रे काढून इतिहास जतन केला. 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत कॅमेरा लहान आणि स्वस्त होऊ लागला. कोडॅकसारख्या कंपन्यांनी असे कॅमेरे बनवले, जे सामान्य लोकही खरेदी करू शकत होते. त्यानंतर 1990 च्या दशकात डिजिटल कॅमेरा आला आणि 2000 सालानंतर मोबाईल कॅमेर्यांनी तर संपूर्ण जगच बदलून टाकले. आज प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्ट फोन हा कॅमेर्याच्या उत्क्रांतीचाच एक महत्त्वाचा टप्पा आहे.