वॉशिंग्टन : गुगलने नुकतीच आपली पिक्सल 10 (Pixel 10) सीरीज जागतिक बाजारात सादर केली असून, यात एक अत्यंत उपयुक्त आणि क्रांतिकारी फीचर देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही जगातील पहिली अशी स्मार्टफोन सीरीज आहे, जी कोणत्याही नेटवर्कशिवाय व्हॉटस्अॅपद्वारे ऑडिओ-व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा देणार आहे.
गुगलने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे टि्वटर) पोस्टमध्ये सांगितले की, पिक्सल 10 सीरीजचे वापरकर्ते लवकरच सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने व्हॉटस्अॅपवर कॉल करू शकणार आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क किंवा वाय-फाय उपलब्ध नाही, अशा आपत्कालीन परिस्थितीत हे फीचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वापरकर्ते थेट अंतराळातील उपग्रहांचा (सॅटेलाईटस्) वापर करून संवाद साधू शकतील.
गुगलने आपल्या पोस्टमध्ये एक टीझरही दाखवला आहे, ज्यात सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीद्वारे ऑडिओ-व्हिडीओ कॉल करण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा फक्त सॅटेलाईट सेवा देणार्या टेलिकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्कवरच काम करेल. भारतातील वापरकर्त्यांना या फीचरचा लाभ घेण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
कारण देशात सॅटेलाईट सेवा अद्याप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली नाही. गुगलचा दावा आहे की, पिक्सल 10 सीरीज सॅटेलाईटद्वारे व्हॉटस्अॅप ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलची सुविधा देणारा जगातील पहिला फोन ठरेल. मात्र, कंपनीने हे तंत्रज्ञान नेमके कसे काम करेल, याबद्दल अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. आतापर्यंत, सॅटेलाईट सेवांचा वापर केवळ नेटवर्क नसलेल्या भागांमध्ये ऑडिओ कॉल आणि एसएमएस पाठवण्यासाठी मर्यादित होता आणि ही सेवादेखील फक्त त्याच देशांमध्ये उपलब्ध आहे, जिथे सॅटेलाईट सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे. त्यामुळे गुगलचे हे नवीन तंत्रज्ञान मोबाईल कम्युनिकेशनच्या जगात मोठा बदल घडवू शकते.