न्युरेमबर्ग : दुसर्या महायुद्धानंतर जर्मनीतील न्युरेमबर्ग ट्रायल्स (न्युरेमबर्ग खटला) जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. पण, या खटल्यापूर्वी नाझी नेत्यांच्या मनाचा कल जाणून घेण्यासाठी अमेरिकन लष्कराने कॅप्टन डग्लस मॅकग्लाशन केली या तरुण मानसोपचारतज्ज्ञाची नियुक्ती केली होती. सामान्य माणसे इतकी क्रूर कृत्ये कशी करू शकतात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष धक्कादायक होते.
डग्लस केली यांनी न्युरेमबर्ग तुरुंगाला मानसोपचारतज्ज्ञांचे खेळाचे मैदान म्हटले होते. त्यांनी हर्मन गोअरिंग आणि रुडॉल्फ हेस यांसारख्या 22 उच्चपदस्थ नाझी नेत्यांच्या मानसिक चाचण्या घेतल्या. केली यांच्या संशोधनाचा सर्वात धक्कादायक निष्कर्ष हा होता की, नाझी नेते मानसिकद़ृष्ट्या आजारी किंवा वेडे नव्हते. उलट, त्यांची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त होती. हिटलरशिवाय हे लोक सामान्य, महत्त्वाकांक्षी आणि मेहनती व्यावसायिक वाटले असते, असे मत केली यांनी मांडले होते.
हिटलरनंतरचा दुसरा सर्वात शक्तिशाली नेता हर्मन गोअरिंग याच्याशी केली यांचे विशेष नाते तयार झाले होते. गोअरिंग हा अत्यंत बुद्धिमान, पण तितकाच अहंकारी होता. फाशीच्या शिक्षेपूर्वी काही तास आधी गोअरिंगने पोटॅशियम सायनाईड घेऊन आत्महत्या केली. न्युरेमबर्गमधून परतल्यानंतर डग्लस केली यांनी गुन्हेगारी शास्त्र (क्रिमिनॉलॉजी) आणि मानसोपचार क्षेत्रात मोठे नाव कमावले. मात्र, नाझींच्या मनाचा वेध घेताना ते स्वतः देखील मानसिक तणावाखाली गेले होते असे मानले जाते. 1 जानेवारी 1958 रोजी, डग्लस केली यांनी देखील आपल्या कुटुंबासमोर पोटॅशियम सायनाईड घेऊन आत्महत्या केली.
न्युरेमबर्ग खटल्यादरम्यान अनेक नाझी नेत्यांनी असा बचाव केला की, त्यांनी वैयक्तिक रागापोटी कोणाला मारले नाही, तर ते फक्त त्यांच्या वरिष्ठांचे आदेश पाळत होते. केली यांच्या लक्षात आले की, हे लोक राक्षस नसून अत्यंत कार्यक्षम नोकरशहा होते, ज्यांनी अत्यंत शिस्तीत लाखो लोकांच्या कत्तलीचे नियोजन केले होते.
केली यांना अशी अपेक्षा होती की, या क्रूर नेत्यांच्या मनात काहीतरी भयानक किंवा विकृत विचार असतील; पण निकाल अनपेक्षित होते. गोअरिंगला त्या डागांमध्ये फुले, फुलपाखरे आणि आनंदी चित्रे दिसली. त्यातून त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि नार्सिसिस्ट (स्वतःवरच प्रेम करणारा) असल्याचे दिसून आले. बहुतांश नाझी नेत्यांच्या चाचण्यांतून असे दिसले की, ते मानसिकद़ृष्ट्या स्थिर होते. त्यांच्यात क्रूरता ही एखाद्या व्यावसायिक कामासारखी भिनलेली होती, कोणत्याही मानसिक आजारामुळे नाही.