नवी दिल्ली : आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी निरंतर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपली फुफ्फुसे चांगल्या प्रकारे काम करीत राहणेही गरजेचे असते. विचित्र जीवनशैली, प्रदूषण तसेच आहारासंबंधी समस्यांमुळे गेल्या दशकभराच्या काळात फुफ्फुसांसंबंधी आजारांची जोखीम वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीचाही याबाबतीत नकारात्मक परिणाम पडलेला आहे. त्यामुळे फुफ्फुसे कशाप्रकारे आरोग्यसंपन्न ठेवावीत याबाबत सातत्याने नवे संशोधन होत असते. आता संशोधकांनी म्हटले आहे की काही विशिष्ट भाज्यांचा आहारात समावेश केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
ब्राेकोली, फ्लॉवरसारख्या भाज्या तसेच केळासारख्या फळाचा वापर जगभरात प्रामुख्याने फायबरसाठी केला जात असतो. मात्र, त्यामधील काही घटक फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहेत. हे घटक फुफ्फुसांमधील संक्रमण कमी करण्यासाठी सहायक होतात. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.
लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना आढळले आहे की क्रूसिफेरस फॅमिलीच्या काही भाज्यांमध्ये विशिष्ट घटक असतात जे आतडे व फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणार्या प्रोटिनला उत्तेजन देतात. हिरव्या पालेभाज्या तसेच पत्ताकोबी, कॉलिफ्लॉवर व अन्य क्रूसिफेरस भाज्यांच्या सेवनाने फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये आढळणार्या एरिल हायड्रोकार्बन रिसेप्टर (एएचआर) नावाच्या प्रोटिनला संकेत पाठवतात. ते आपल्या फुफ्फुसात एक निरोगी वातावरण निर्माण करतात जे अंतर्गत यंत्रणेला निरोगी ठेवण्याबरोबरच बाह्य संक्रमणाच्या जोखिमांपासून सुरक्षा देण्यासही मदत करतात.
संशोधकांनी याबाबत उंदरांवरही प्रयोग केले आहेत. त्यांनी फ्लू व्हायरसने उंदरांना संक्रमित करून त्यांच्यावर परीक्षण केले. त्यांना आढळले की क्रूसिफेरस घटकांनी संपन्न असा आहार घेणार्या उंदरांच्या फुफ्फुसांचे कमी नुकसान झाले. 'एएचआर'ने फुफ्फुसांमधील संक्रमणाचा धोका कमी केला. इम्पिरियल कॉलेजमधील संक्रामक रोगतज्ज्ञ डॉ. जॉन ट्रेगोनिंग यांनी सांगितले की फुफ्फुसांच्या पेशींना विषाणू संक्रमणानंतर होणार्या हानीपासून कसे वाचवावे याची माहिती या संशोधनामधून जाणून घेण्यास मदत मिळाली आहे.