Dead Sea | जगातील सर्वात सखल जागा कोणती? Pudhari File Photo
विश्वसंचार

Dead Sea | जगातील सर्वात सखल जागा कोणती?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाण कोणते, असे विचारल्यास क्षणाचाही विलंब न लावता उत्तर येते ‘माऊंट एव्हरेस्ट’. समुद्रसपाटीपासून तब्बल 8,800 मीटर (29,000 फूट) उंच असलेले हे शिखर सर्वांनाच परिचित आहे. पण, तुम्हाला जमिनीवरील सर्वात सखल किंवा खोलगट ठिकाण कोणते आहे, हे माहिती आहे का? हे ठिकाण आहे मध्य पूर्वेतील ‘डेड सी’ म्हणजेच मृत समुद्राचा किनारा. नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (छजअअ) नुसार, हा भाग समुद्रसपाटीपासून सुमारे 430 मीटर (1,300 फूट) खाली आहे. त्यामुळे जमिनीवर असूनही तो समुद्राच्या पातळीपेक्षा खूपच खोल आहे.

‘डेड सी’चा किनारा हा जमिनीवरील सर्वात सखल भाग असला, तरी तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल बिंदू नाही. तो मान पॅसिफिक महासागरातील मारियाना ट्रेंचमधील ‘चॅलेंजर डीप’ या ठिकाणाला जातो. हे ठिकाण समुद्राच्या पृष्ठभागापासून तब्बल 10,935 मीटर (35,876 फूट) खोल आहे. ‘डेड सी’ची एक खासियत म्हणजे त्याच्या पाण्याची पातळी रोज बदलू शकते. नासाच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उष्णतेमुळे होणार्‍या बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी दररोज 2 ते 3 सेंटिमीटर (1 इंच) पर्यंत कमी होऊ शकते.

‘डेड सी’ हे नावाप्रमाणे समुद्र नसून खार्‍या पाण्याचे एक विशाल सरोवर आहे. याची लांबी 76 किलोमीटर असून, रुंदी 18 किलोमीटरपर्यंत आहे. या पाण्यातील क्षारांचे प्रमाण इतके जास्त आहे की, त्यात कोणतेही जलचर किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाहीत. हेच पाहून पूर्वीच्या लोकांनी याला ‘मृत समुद्र’ असे नाव दिले होते. ‘डेड सी’ची निर्मिती ही एका मोठ्या भूगर्भीय घटनेचा परिणाम आहे. हे सरोवर ‘डेड सी फॉल्ट’ नावाच्या एका मोठ्या भेगेवर वसलेले आहे, जी सुमारे 1,000 किलोमीटर लांब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT