कोलकाता : बंगालच्या किनारपट्टीवर थडकेल, अशा रेमल चक्रीवादळाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. तसे पाहता प्रत्येक चक्रीवादळाला नवनवी नावे दिली जातात. आता अशा चक्रीवादळांना नावे का देतात आणि बंगालच्या किनारपट्टीवर जे 'रेमल'
चक्रीवादळ थडकणे अपेक्षित आहे, त्याचा नेमका अर्थ तरी काय, हे अर्थातच रंजक आहे.
युनायटेड नेशन्स एजन्सी जागतिक हवामान संघटनेच्या मते, एका विशिष्ट भौगोलिक स्थानावर किंवा संपूर्ण जगामध्ये एका वेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळे असू शकतात आणि ते एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ ती राहू देखील शकतात. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी हे प्रयोजन करण्यात आले. सुरुवातीला वादळांना कोणताही देश नावे देऊ शकत होता, मात्र त्यामुळे गोंधळ होऊ लागला. नंतर, हवामानशास्त्रज्ञांनी अधिक संघटित आणि कार्यक्षम प्रणालीअंतर्गत एका यादीतून वादळांची नावे देण्याचा निर्णय घेतला.
जागतिक मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन , 13-राष्ट्रीय संस्था, जगभरात चक्रीवादळांना नाव देतात. या दोन्ही संघटनातील समाविष्ट 13 देशांमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन यांचा समावेश आहे. आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये, अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. ते लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतींबाबत तटस्थ असतात. हे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावे, असेही यामध्ये म्हटले आहे. एकदा एखादे नाव वापरले, की ते पुन्हा वापरता येत नाही. देशांनी दिलेल्या नावांची यादी तयार केली आहे. बंगालच्या खाडीत आलेल्या रेमल चक्रीवादळाला नाव ओमानने दिले आहे. 'रेमल' हा अरबी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ वाळू किंवा रेती असा होतो.