नवी दिल्ली : पश्चिम अंटार्क्टिकातील थ्वेटस् ग्लेशियर सध्या ताज्या वैज्ञानिक विश्लेषणानुसार, जागतिक हवामान बदलाच्या केंद्रस्थानी आहे. शास्त्रज्ञ या हिमनदीला डूम्सडे ग्लेशियर म्हणजेच प्रलयाची हिमनदी असे म्हणतात. भविष्यात समुद्राची पातळी किती वाढणार, हे समजून घेण्यासाठी हे ठिकाण जगातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
हा थ्वेटस् ग्लेशियर साधारणपणे फ्लोरिडा राज्याएवढा किंवा ब्रिटन देशाएवढा मोठा आहे. सध्या जगातील समुद्राची पातळी जी दरवर्षी वाढत आहे, त्यातील 4 टक्के वाटा एकट्या थ्वेटस् ग्लेशियरचा आहे. जर थ्वेटस् ग्लेशियर पूर्णपणे वितळला, तर समुद्राची पातळी सुमारे 65 सेंटिमीटरने (2 फुटांहून अधिक) वाढू शकते. हा ग्लेशियर एका बुचासारखा (क्रॉक) काम करतो. या थ्वेटस् ग्लेशियरने आजूबाजूच्या इतर हिमनद्यांना अडवून धरले आहे. जर हा कोसळला, तर इतर हिमनद्याही वेगाने समुद्रात जातील, ज्यामुळे समुद्राची पातळी 3 मीटरपर्यंत वाढण्याचा धोका आहे. यामुळे मुंबई, न्यूयॉर्क, टोकियो यासारखी किनारपट्टीवरील शहरे पाण्याखाली जाऊ शकतात.
थ्वेटस् ग्लेशियर का वितळत आहे?
समुद्राचे गरम पाणी या हिमनदीच्या खालच्या थरापर्यंत पोहोचत आहे. हे पाणी हिमनदीला खालून हळूहळू वितळवत आहे. थ्वेटस् ज्या जमिनीवर आहे, ती जमीन आतल्या बाजूला खोल आणि उतरती आहे. त्यामुळे एकदा का पाणी आत शिरले की, ते हिमनदीला वेगाने मागे ढकलते. हिमनदीच्या समोर असलेले बर्फाचे कवच (आईस शेल्फ) आता कमकुवत झाले असून, त्याला मोठ्या भेगा पडत आहेत.
शास्त्रज्ञ आता आईसफिनसारख्या पाण्याखालील रोबोचा वापर करून या हिमनदीच्या अगदी खालच्या भागाचा अभ्यास करत आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, गरम पाणी हिमनदीच्या भेगांमध्ये शिरून तिला आतून पोखरत आहे. हा थ्वेटस् ग्लेशियर पूर्णपणे कोसळायला कदाचित काही दशके किंवा शतके लागतील; पण त्याच्या वितळण्याचा वेग ज्या प्रकारे वाढत आहे, तो येणार्या शतकासाठी एक मोठा इशारा आहे.