वॉशिंग्टन : सध्याच्या ‘एआय’ला संशोधक ‘आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स’ म्हणतात. याचा अर्थ ते कमकुवत असून, मानवी बुद्धिमत्तेशी बरोबरी करणारे नाही. भविष्यात ‘एजीआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ येऊ शकते, असे म्हटले जाते. ते मानवी बुद्धिमत्तेच्या तोडीचे असेल व त्यापुढे मानवी बुद्धिमत्तेपेक्षाही सरस असे ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ (एएसआय) येऊ शकेल अशी कल्पना केली जाते.
यंत्रं एक दिवस मानवी बुद्धिमत्तेशी बरोबरी करतील किंवा तिला मागे टाकतील, ही कल्पना फार जुनी असली, तरी अलीकडील दशकांतील एआय मधील प्रगतीमुळे यावर पुन्हा लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषत:, ओपन एआय, गुगल आणि अँथ-ोपिकसारख्या कंपन्यांनी तयार केलेल्या ताकदवान लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) मुळे ही शक्यता वाढीस लागली आहे. या तथाकथित ‘artificial super intelligence (ASI)‘’बाबत तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. काहींच्या मते ती अजून दूर आहे, तर काहींच्या मते ती दाराशीच येऊन ठेपली आहे; मात्र हे नक्की की, जेव्हा कधी ‘एएसआय’ प्रत्यक्षात येईल, तेव्हा तिचे मानवजातीवर खोल परिणाम होतील.
‘मी विश्वासाने सांगू शकतो की, आपण एका नवीन युगात प्रवेश करू, जिथे वैज्ञानिक शोध अधिक जलदगतीने होतील, आर्थिक प्रगती वेग घेईल, आयुष्याची मुदत वाढेल आणि मनोरंजनाच्याही नव्या शक्यता उगम पावतील,’ असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील एआय प्राध्यापक आणि ‘गुगल डीपमाईंड’चे मुख्य वैज्ञानिक टिम रॉकटॅशेल यांनी सांगितले. मात्र, त्यांनी ही आपली वैयक्तिक मते असून, ती ‘गुगल डीपमाईंड’ची अधिकृत भूमिका नाही, असेही स्पष्ट केले. त्यांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटले की, ‘इतिहासातील इतर अनेक तांत्रिक प्रगतीप्रमाणे यामध्येही धोका आहे.’
पारंपरिक एआय संशोधन हे विशिष्ट बुद्धिमत्तेच्या गुणधर्मांची नक्कल करण्यावर केंद्रित होते, जसे की द़ृश्य विश्लेषण, भाषा समजून घेणे किंवा पर्यावरणात मार्गक्रमण करणे. रॉकटॅशेल यांच्या मते, अशा अनेक मर्यादित क्षेत्रांमध्ये ‘एआय’ ने मानवी क्षमतांपेक्षा अधिक कामगिरी केली आहे. विशेषतः, गो आणि चेस यांसारख्या खेळांमध्ये. मात्र, या क्षेत्राचे अंतिम ध्येय हे नेहमीच सामान्य बुद्धिमत्ता निर्माण करणे हे राहिले आहे, जी माणसे आणि प्राणी दाखवतात, म्हणजेच अनेक प्रकारच्या क्षमतांचे एकत्रित रूप. यालाच आधी स्ट्राँग एआय किंवा युनिव्हर्सल एआय असे म्हटले जात होते; पण आता याला ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (AGI) असे म्हटले जाते.
‘दीर्घ काळ AGI हे केवळ दूरवर असलेले स्वप्न वाटत होते,’ असे रॉकटॅशेल म्हणाले. ‘पण आता foundation models (LLMs) मुळे आपण अशा ‘एआय’ चा अनुभव घेत आहोत जी विविध विद्यापीठ प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय गणित व कोडिंग स्पर्धांमध्येही भाग घेत आहे.’ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ म्हणजेच मानवी स्तरावरील बुद्धिमत्ता असलेली यंत्रणा आता केवळ कल्पनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, असं ‘गुगल डीपमाईंड’ चे वैज्ञानिक आणि ‘एआय’ प्राध्यापक टिम रॉकटॅशेल यांनी सांगितलं आहे.
एकदा का एखादी यंत्रणा माणसाइतक्या विविध कामांमध्ये पारंगत झाली, की लगेचच ती मानवी क्षमतांपेक्षा कितीतरी अधिक कार्यक्षम होऊ शकते, म्हणजेच ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’(एएसआय) चा टप्पा. ‘एकदा का AGI गाठलं, की मग ASI फार लांब नाही,’ असं रॉकटॅशेल यांचं मत आहे. यानंतर बि-टिश गणितज्ञ आयर्विंग जॉन गुड यांनी 1965 मध्ये सांगितलेल्या ‘बुद्धिमत्तेच्या स्फोट’ ची शक्यता उभी राहते. त्यांच्या मते, जर यंत्रे स्वतःला सुधारू शकली, तर ती अल्पावधीतच माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची पातळी गाठतील. त्यांनी अशा यंत्रणेला ‘माणसाने कधीही करावी लागणारी शेवटची शोधयंत्रणा’ असं म्हटलं होतं.
भविष्यवेत्ता रे कर्झवेल यांच्या मते, यामुळे ‘टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी’ घडेल - एक असा टप्पा, ज्यानंतर मानवजातीच्या संस्कृतीत आमूलाग्र आणि अपरिवर्तनीय बदल घडतील. त्यांनी 2005 मध्ये भाकीत केलं होतं की AGI 2029 पर्यंत तयार होईल आणि सिंग्युलॅरिटी 2045 पर्यंत होईल. एका अलीकडील सर्वेक्षणात 2,778 AI संशोधकांनी सरासरी 2047 पर्यंत ASI येण्याची 50% शक्यता मानली आहे. बहुतेक तज्ज्ञांचे मत आहे की AGI 2040 पर्यंत संभवते.