Summer Heat Wave | उन्हाळ्यातील ‘नवतपा’ म्हणजे काय? 
विश्वसंचार

Summer Heat Wave | उन्हाळ्यातील ‘नवतपा’ म्हणजे काय?

राजस्थानी संस्कृतीत कडक उन्हाच्या नऊ दिवसांचे काय महत्त्व आहे?

पुढारी वृत्तसेवा

जयपूर : सध्या उन्हाळ्यातील अतिशय कडक उन्हाच्या नऊ दिवसांचा ‘नवतपा’ हा काळ सुरू झालेला आहे. ‘नवतपा’ हा शब्द प्रामुख्याने उत्तर आणि मध्य भारतात, विशेषतः राजस्थानच्या लोकसंस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. खगोलशास्त्रीय द़ृष्टिकोन, हवामान आणि लोकसंस्कृती यांच्या मिलाफातून या संकल्पनेचा जन्म झाला आहे.

‘नवतपा’ या शब्दाची फोड ‘नव’ (नऊ) आणि ‘तपा’ (तापणे किंवा प्रचंड उष्णता) अशी होते. हा उन्हाळ्यातील सर्वात उष्ण असा नऊ दिवसांचा काळ असतो. हिंदू पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा नवतपा सुरू होतो. सूर्य या नक्षत्रात एकूण 15 दिवस असतो, पण त्यातील पहिले 9 दिवस सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर भौगोलिकद़ृष्ट्या अशा स्थितीत असते की सूर्याची किरणे थेट (लंबरूप) पडतात. दरवर्षी साधारणपणे 25 मे ते 2 जून दरम्यान हा काळ येतो. या 9 दिवसांत उत्तर भारतात प्रचंड उष्णता वाढते, तापमान पन्नास अंशांच्या जवळ पोहोचते आणि तीव— उष्ण वारे (ज्याला ‘लू’ म्हणतात) वाहतात.

जरी नवतपाचा प्रभाव संपूर्ण उत्तर भारतात दिसत असला, तरी याचे मूळ आणि याच्याशी जोडलेल्या परंपरा राजस्थानच्या लोकसंस्कृतीशी आणि लोकजीवनाशी घट्ट विणलेल्या आहेत. वाळवंटी प्रदेश असल्यामुळे राजस्थानसाठी हा काळ जीवन-मरणाचा आणि भविष्यातील आशेचा ठरतो. राजस्थानच्या ग्रामीण भागात एक जुनी म्हण किंवा लोकश्रुती आहे, ‘नवतपा जितका जास्त तापेल, तितकाच पावसाळा चांगला होईल.‘वैज्ञानिकद़ृष्ट्याही हे सत्य आहे; कारण या 9 दिवसांत वाळवंटात जितकी जास्त उष्णता निर्माण होईल, तितका तिथे कमी दाबाचा पट्टा मजबूत होतो, जो मान्सूनच्या ढगांना आपल्याकडे वेगाने खेचून आणतो. त्यामुळे राजस्थानचे शेतकरी नवतपाच्या उष्णतेने घाबरत नाहीत, उलट आनंद प्रगट करतात की, यावर्षी पीकपाणी उत्तम होईल.

राजस्थानच्या मांड आणि इतर लोकगीतांमध्ये नवतपा, कडक ऊन आणि ‘लू’ (उष्ण वारे) यांचे अनेक संदर्भ आढळतात. विरहाची गाणी किंवा निसर्गाशी चाललेल्या संघर्षाची गाणी गाताना ग्रामीण महिला या काळातील निसर्गाच्या रौद्र रूपाचे वर्णन आपल्या लोकगीतांमध्ये करतात. राजस्थानच्या लोकसंस्कृतीने या जीवघेण्या उष्णतेचा सामना करण्यासाठी स्वतःची एक जीवनशैली विकसित केली आहे, जी नवतपा दरम्यान काटेकोरपणे पाळली जाते. या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी ‘राबडी’ (बाजरी आणि ताक आंबवून बनवलेले पेय), ‘आम पन्ना’ (कैरीचे पन्हे), ताक आणि ‘सत्तू’ चे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. कडक उन्हापासून वाचण्यासाठी डोक्याला पागोटे (साफा) किंवा सुती ओढणीने चेहरा पूर्ण झाकण्याची पद्धत या काळात संस्कृतीचा अनिवार्य भाग बनते. राजस्थानमध्ये नवतपा दरम्यान केवळ स्वतःचीच नाही, तर मुक्या प्राण्यांची आणि वाटसरूंची काळजी घेण्याची लोकपरंपरा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT